पुणे । स्मार्ट सिटी प्रकल्पाचा मांडलेला अपूर्ण खेळ पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्त यांना सहा महिने मुदतवाढ मिळण्यासाठी शक्यता आहे. महापालिका आयुक्तांनीच सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, असे पत्र नगरविकास खात्याला पाठवले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आयुक्त कुणाल कुमार पुण्याच्या चांगलेच प्रेमात पडले असून कितीही टीका झाली तरीही त्यांना किमान सहा महिने तरी इथेच काम करण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आयुक्त कुमार यांना 22 ऑगस्टला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. भाजपमधील काही पदाधिकारी आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्यामुळे त्यांची बदली करावी अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली होती, मात्र स्मार्ट सिटी प्रकल्पातील बरीच कामे अद्याप मार्गी लागलेली नाहीत. भाजपची ही महत्त्वाकांधी योजना असल्यामुळे या प्रकल्पाचे काम योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. येत्या काही महिन्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने स्मार्ट सिटी योजना हा प्रचाराचा मुद्दा असणार असल्यामुळे ही कामे पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्तांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
चोवीस तास पाणीपुरवठा योजनेची निविदा रद्द झाल्यामुळे आता नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात येत आहे. या योजनेचे संपूर्ण काम आयुक्त कुमार यांच्या देखरेखी खाली झाले आहे. सुमारे तीन हजार कोटी रुपयांची योजना यशस्वी करण्यासाठी योजनेची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी आवश्यक आहे. या योजनेला खोडा बसल्याने याची विपरित परिणाम भाजपला भोगावे लागतील. त्यामुळेच कुणाल कुमार यांना मुदतवाढ दिली जाणार आहे.