पुणे : पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांना बदलून त्यांच्या जागी एका जिल्हाधिकार्याची वर्णी लावण्याचा भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याचा प्रयत्न पक्षातीलच राजकारणामुळे उधळला गेला. मंत्री असलेल्या या नेत्याशी संबंधित जिल्हाधिकारी यांची चांगलीच सलगी असून, ती बाबदेखील पुणे शहरात सर्वांना खटकत आहे.
मुख्यमंत्र्यांमार्फत लावली फिल्डिंग!
गेल्या महिन्यात राज्य शासनाच्या अनेक अधिकार्यांच्या बदल्या झाल्या. त्याचदरम्यान पुणे महापालिका आयुक्तांची बदली करण्याचा घाट भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने घातला होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. महापालिका आयुक्तपदावर एका मर्जीतील व जिल्हाधिकारीपदावरील अधिकार्याला आणण्याचा प्रयत्नही या नेत्याने केला. याची कुणकुण भाजपमधील पुण्यातील नेत्यांना लागली, त्यातील काहींनी थेट मुख्यमंत्र्यांची दारे ठोठावली. संबंधित नेत्याची चाल यशस्वी होऊ नये अशी फिल्डिंग लावली गेली. कुणाल कुमार यांना पुढे चाल देण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला. त्याच वेळी पीएमआरडीएमधील खांदेपालटाची चर्चा झाली.
भाजपअंतर्गत राजकारणाने खाल्ली उचल
महापालिका निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षात पुण्यामध्ये मोठी गटबाजी निर्माण झालेली आहे. खासदार संजय काकडे यांना वेसण घालण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी मुख्यमंत्री हे खा. काकडे यांच्या पाठीशी राहिले. भाजपला बहुमत मिळाल्यावर स्वीकृत सभासद निवडताना महापालिकेत मारामारीच झाली. मुख्यमंत्रीविरुध्द पालकमंत्री असे राजकीय चित्र निर्माण झाले. महापालिकेतील पदाधिकारी आणि पक्ष संघटना यांच्यातही फार जमत नाही अशी चर्चा चालू झाली आहे. प्रभाग समित्यांचे अध्यक्ष निवडतानाही पक्षात कुरबुरी होत राहिल्या. पुण्यातील प्रशासकीय अधिकारी नेमतानाही भाजपचे अंतर्गत राजकारण उचल खाऊ लागले आहे. पक्षात गटबाजी नाही एकच व्यक्ती याला कारणीभूत आहे आणि वरिष्ठांनीही दखलही घेतली आहे, असे भाजपच्या जबाबदार नेत्याने दैनिक जनशक्तिशी बोलताना स्पष्ट केले.