आयुक्तांचे आश्वासन; गरीब कुटुंबांना लाभ
पुणे : आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना सर्वप्रकारच्या आजारांसाठी केंद्र शासनाकडून सुरू केलेली आयुष्मान भारत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे. आयुष्मान भारत या योजनेची शहरात प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सौरभ राव यांनी ही माहिती दिली.
सुमारे 1 लाख 43 हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याची यादी मनपा आरोग्य विभागाला उपलब्ध झाली आहे. प्रभागनिहाय या यादीची विभागणी करण्यात येणार आहे. क्षेत्रिय अधिकारी, प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक यांच्या उपस्थितीत क्षेत्रिय कार्यालयानुसार बैठका घेण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रभागनिहाय योजनेच्या कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम पूर्ण करणार आहे. योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबविणार आहे. असे गोगावले यांनी कळविले आहे.
पाच लाखांपर्यंतचे उपचार
केंद्र शासनाने केलेल्या सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणात शहरातील 1 लाख 43 हजार कुटुंबाची या योजनेचे लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे. या सर्वेक्षणानुसार कुटुंबांची यादी महापालिकेला देण्यात आली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना महापालिकेच्या माध्यमातून केंद्र शासनाने शहरात निश्चित केलेल्या रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार दिले जाणार आहेत. 15 फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम पूर्ण करणार आहे.