आशा स्वयंसेविका करणार माहिती संकलीत
भुसावळ (प्रतिनिधी)- सन 2018-19 या वर्षामध्ये आयुष्यमान भारत अभियान आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून राबविले जाणार आहे. अभियानातंर्गत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियान शहरी लाभार्थी पडताळणी व अतिरीक्त माहिती संकलन मोहीम ही 28 मे ते 3 जूनदरम्यान राबवली जात असून आशा स्वयंसेविका विहित नमुन्यामध्ये माहिती गोळा करणार आहेत.
मान्यताप्राप्त रुग्णालयाचा होईल लाभ
आयुष्यमान भारत अभियानास केंद्रीय मंत्रीमंडळाने 21 मार्च रोजी मंजुरी दिली आहे. यामध्ये गरीब व दुर्बल घटक यांना पाच लाख रुपये प्रती कुटुंब, प्रती वर्ष विमा संरक्षण या स्वरूपात मंजूर केलेला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी देशभरातील कोणत्याही शासन मान्यता प्राप्त रुग्णालयात लाभ घेवू शकतो. योजनेंतर्गत नोंदणी करण्यात आलेले कुटुंब हे उत्पन्नाच्या स्त्रोतावरून समाविष्ट केलेले आहे. यामध्ये कचरा वेचणारे, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर विक्री करणारे, बांधकाम करणारे, सफाई कर्मचारी, शिंपी, माळी, रिक्षा चालक, दुकानात काम करणारे, वेटर, धोबी झाडू काम करणारे, वेल्डर, चौकीदार, वीज तंत्री, मेकॅनिक, दुरुस्ती करणारे आदी कामाची वर्गवारी करण्यात आली आहे.
28 मे ते 3 जूनदरम्यान मोहिम
या अभियानाची लोकप्रतिनिधी, वॉर्ड नोडल अधिकारी, आशास्वंयसेविका यांचे माध्यमातून जनमानसात जनजागृती केली जाणार आहे. लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलन मोहिम ही 28 मे ते 3 जून या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. नगरपरीषद भुसावळ क्षेत्रातील 47 प्रभागातील पात्र कुटुंबाची संख्या 11 हजार 687 यांची यादी केंद्रीय मंत्रीमंडळाकडून अद्यावत करून देण्यात आलेली आहे. ही यादी केंद्र शासनाने तयार करून पाठवलेली असल्यामूळे यादीमध्ये कोणताही बदल स्थानिक पातळीवर केला जाणार नाही. योजनेतील नमूद लाभार्थीची माहिती अद्यावत करण्याकरीता लाभार्थीचा मोबाईल नंबर, रेशनकार्ड नंबर देणे आवश्यक आहे. माहिती आशा स्वयंसेविकांना देवून संकलित करण्यात आलेल्या माहितीचे प्रमाणीकरण करण्यास नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, आरोग्य समिती सभापती मेघा वाणी, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, नगरपरीषद रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, डॉ.संदीप जैन, डॉ.नृपाली सावकारे, डॉ.आर्शिया शेख यांनी केले आहे.