30 बेडच्या रुग्णालयाला 8 कोटी 99 लाखांचा निधी मंजूर
पुणे : राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यात पुण्यासह अहमदनगर, नंदुरबार आणि सिंधुदुर्ग या चार ठिकाणी आयुष रुग्णालय बांधण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्याशिवाय 30 बेडच्या रुग्णालयाला प्रत्येकी 8 कोटी 99 लाख 51 हजार 793 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या वर्षात जानेवारी महिन्याअखेर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात बांधकामास सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अॅलोपॅथीच्या उपचारांना पर्याय तसेच सामान्य रुग्णांना आयुर्वेद, होमिओपॅथीचे उपचार मिळावेत, यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या कार्यक्रमांतर्गत राज्यात चार जिल्ह्यांत आयुष हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रस्ताव राज्याच्या आयुष संचालनालयाने तयार केला होता. यानुसार केंद्र सरकारकडे त्याचा प्रस्ताव राज्याच्या आयुष संचालनालयाकडून पाठविण्यात आला होता. त्याशिवाय राज्य सरकारकडे हा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविला होता. या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यात पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग, नंदुरबार या ठिकाणी आयुष रुग्णालय उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच ‘आयुष’
जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच आयुष रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यामुळे अॅलोपॅथीच्या उपचारांसोबत प्रत्येक रुग्णाच्या मागणी आणि गरजेनुसार त्याला आयुर्वेदापासून ते होमिओपॅथीपर्यंतचे उपचार मिळणे शक्य होणार आहे. या निमित्ताने राज्यात राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथीपर्यंतच्या औषधप्रणालीचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होणार आहे. पुण्यासह राज्यात उभारल्या जाणार्या 30 बेडच्या आयुष रुग्णालयांतर्गत पंचकर्म, आयुर्वेद, युनानी, योग, मेडिटेशन उपचारपद्धतींचा समावेश असेल. स्त्री, पुरुषांसाठीच्या स्वतंत्र वॉर्डाचा यात समावेश असेल.
रुग्णालय उभारण्यास गती
राज्यात राष्ट्रीय आयुष मिशनअंतर्गत चार ठिकाणी आयुष रुग्णालय उभारण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे 30 बेडचे प्रत्येक रुग्णालय उभारण्यासाठी 8 कोटी 99 लाख 51 हजार 793 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्या निधीमध्ये केंद्राने 60 टक्के तर राज्य सरकारने 40 टक्के निधीचा वाटा उचलला आहे. पुण्यासह नगर, नंदुरबार आणि सिंधुदुर्ग या ठिकाणच्या जिल्हा हॉस्पिटलच्या आवारातच हे हॉस्पिटल उभारले जाईल. त्याकरिता सुमारे 14 ते 15 गुंठे जमीन आरोग्य विभागाने देण्याचे मान्य केले आहे. जागेचा आराखडा केंद्र आणि राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. आता प्रशासकीय मान्यता मिळाली असून, आयुष रुग्णालय उभारण्यास आता गती मिळणार आहे.
जानेवारी अखेर कामाचा शुभारंभ
पुण्यात औंध येथे जिल्हा हॉस्पिटलच्या आवारात आरोग्य विभागाची मोठी जागा आहे. त्या जागेपैकी हॉस्पिटलच्या आवारात 15 गुंठे आवश्यक जागा देण्यात येणार आहे. येत्या जानेवारी अखेर या चारही हॉस्पिटलच्या बांधकामासाठीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. प्रत्येकी आठ कोटी 99 लाख 51 हजार 793 रुपयांप्रमाणे चार हॉस्पिटलसाठी सुमारे 35 कोटी 98 लाख 7 हजार 172 रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. त्यामुळे या चारही ठिकाणी बांधकामाची प्रक्रिया लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही, असे राष्ट्रीय आयुष मिशनचे सहायक संचालक डॉ. उमेश तागडे यांनी सांगितले.