आयोगाच्या कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा

0

शहापूर । राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग नवी दिल्ली आयोजित राष्ट्रीय क्षेत्रीय कार्यशाळा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भाईंदर येथे संपन्न झाली. कार्यशाळेत सहभागी झालेले जिल्हा परिषद शाळा धसई येथील पदवीधर शिक्षक चिंतामण वेखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग नवी दिल्ली यांनी ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय क्षेत्रीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भाईंदर येथे संपन्न झाली. यावेळी मधुलिका शर्मा यांनी विविध विषयांवर कलमांसह मार्गदर्शन केले.

विविध विषयांवर साधला सुसंवाद
या कार्यशाळेत राज्यातील शिक्षणतज्ज्ञ, लोकप्रतिनिधी, अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पंचायत समिती सभापती, ग्रामपंचायत सदस्य व शिक्षक वर्ग सहभागी झाले होते तसेच या कार्यशाळेत बालकांच्या शिक्षणाचा अभ्यासक्रम, पोषण आहार, इमारत, वीजबिल, ग्रामसहभाग, पदाधिकारी भूमिका, गुणवत्ता, शासकीय शाळा, खासगी शाळा गणवेश, व्यवस्थापन समिती सहभाग, शिक्षक भरती, वीस पटाच्या आतील शाळा, दिव्यांग विद्यार्थी इत्यादी अनेक विषयांवर चर्चा झाली. यावेळी उपस्थितांकडून विविध समस्या आयोगासमोर मांडण्यात आल्या.

यांचा होता सहभाग
ठाणे जिल्ह्यातून या कार्यशाळेसाठी शिक्षण अधिकारी भागवत मॅडम, यांच्यासह शहापूर तालुक्यातून धसई ग्रामपंचायत सरपंच सुनील पुंडलिक वाख सरपंच, अस्नोली ग्रामपंचायतीचे सदस्य रघुनाथ धोंडू दिनकर, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश पवार, विद्या नाईकवाडी, केंद्रप्रमुख दिनानाथ दूधसागरे, धसई शाळेचे पदवीधर शिक्षक चिंतामण वेखंडे, नवनीत फर्डे प्रा. शिक्षक अस्नोली यांच्या सहभागासाठी निवड झाल्याने या सर्वांनी आपला सहभाग नोंदवला.