आरएफआयडी तंत्रज्ञानाने गस्त होणार कडेकोट

0

शहरात 200 ठिकाणांवर दररोज हजेरी ; गुन्हेगारीला निश्‍चित बसणार आळा -अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग

भुसावळ :- भुसावळ शहर व बाजारपेठ हद्दीतील मोक्याच्या 200 ठिकाणी आरएफआयडी तंत्रज्ञान बसवण्यात आले असून त्यामुळे पोलिसांची कडेकोट गस्त होवून गुन्हेगारीला निश्‍चित आळा बसेल, असा विश्‍वास अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी येथे व्यक्त केला. त्यांच्या हस्ते या यंत्रणेचे औपचारीक उद्घाटन शुक्रवारी दुपारी करण्यात आले. ते म्हणाले की, शहर हद्दीत 50 तर बाजारपेठ हद्दीत 150 स्पॉट निश्‍चित करण्यात आले असून दररोज बंदोबस्तावरील कर्मचारी रात्रपाळीत गस्त घालताना या स्पॉटवर भेट देऊन पंचिंग करेल त्यामुळे गस्त झाली वा नाही त्याबाबत यंत्रणेला तातडीने दुसर्‍या दिवशी अहवाल मिळेल त्यामुळे गुन्हेगारी रोखण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात 18 ठिकाणी तंत्रज्ञान
बच्चन सिंग यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात हे तंत्रज्ञान राबवले जात आहे. 18 पोलीस ठाण्यात ही यंत्रणा कार्यान्वित केली जात असून लवकरच निंभोरा, यावल, नशिराबाद येथेही ही यंत्रणा बसवली जाईल. याप्रसंगी सहाय्यक पोली अधीक्षक नीलोत्पल, डीवायएसपी राजेद्र रायसिंग यांची उपस्थिती होती. आरएफआयडी सिस्टममध्ये बाजारपेठ पोलिस ठाण्यातील 85 तर शहर पोलिस ठाण्यातील 50 कर्मचार्‍यांच्या अंगठ्याचे ठसे सेव्ह करण्यात आले आहेत. या यंत्रणेमुळे रात्र गस्तीवरील कर्मचार्‍याला संबंधित ठिकाणी असलेल्या वहीवर स्वाक्षरी करण्याचा ताण कमी झाला असून दांडी मारणे अशक्य ठरणार आहे.