भटिंडा:आपला देश 150 वर्ष पारतंत्र्यात होता, सगळ्या देशात स्वातंत्र्य लढा उभा राहिला होता. त्यावेळी आरएसएसचे लोक इंग्रजांची चमचेगिरी करत होते, असा घणाघाती आरोप कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केला आहे. पंजाबमधल्या भटिंडा या ठिकाणी त्या बोलत होत्या.
लोकसभा निवडणुकांचा शेवटचा टप्पा १९ तारखेला होणार आहे. त्याआधी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चांगल्याच रंगल्या आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांवर निशाणा साधत आहेत. विरोधक म्हणजे महामिलावटी लोक आहेत अशी टीका मोदी करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस नेते मोदींवर निशाणा साधत आहेत. ‘चौकीदार चोर है’ या घोषणा काँग्रेसच्या सभेत दिल्या जात आहेत. तर प्रियंका गांधी यांनी मोदींची तुलना दुर्योधनासोबत केली.
२३ मे रोजी दुर्योधन कोण आणि अर्जुन कोण हे स्पष्ट होईल असं प्रत्युत्तर अमित शाह यांनी दिलं आहे. एकमेकांवरचे हे आरोप प्रत्यारोप थांबत नसतानाच आज पुन्हा एकदा प्रियंका गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. संघाचे लोक स्वातंत्र्य लढा सुरू असताना इंग्रजांची चमचेगिरी करत होते अशी टीका त्यांनी भटिंडामधल्या सभेत केली. आता या टीकेला भाजपा किंवा आरएसएसचे लोक काही उत्तर देणार का हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.