आरक्षणविरोधी भारत बंदमध्ये 12 जखमी

0

कडेकोट पोलिस बंदोबस्त, जमावबंदीमुळे परिस्थिती नियंत्रणात
इंटरनेट सेवाही दिवसभरासाठी बंद
बिहारमध्ये हिंसाचाराची घटना

नवी दिल्ली : सोशल मीडियावरून काही गटांनी आरक्षणविरोधात पुकारलेल्या भारत बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. बिहारमध्ये काही लोकांनी जबदरस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केल्याने हिंसाचाराच्या घटना घडल्या. बिहारमधील सुमारे सतरा-अठरा जिल्ह्यांमध्ये आरक्षणविरोधी गटांनी जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले. तर काही भागात रेल्वे रोको, रास्ता रोको, बाजार बंद करण्यात आला. मागील आठवड्यात दलित संघटनांनी केलेल्या भारत बंदला राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशसह अन्य तीन राज्यात अतिशय हिंसक वळण लागले होते. त्यामुळे मंगळवारच्या या बंदपूर्वी संरक्षण यंत्रणांनी काळजी घेतल्याने मोठ्याप्रमाणात हिंसक घटना घडल्या नाहीत. काही ठिकाणी जमावबंदी करण्यात आली होती तर अनेक ठिकाणी इंटरनेट बंद करण्यात आले होते.

पटणाजवळील आरा शहरात लाठीमार
पटणापासून 70 किलोमीटरवर असलेल्या आरा शहरात आरक्षणविरोधी बंददरम्यान दलितांशी संघर्ष झाल्याने सुमारे डझनभर लोक जखमी झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला. यानंतर शहरात बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पटणा, बेगुसराई, लखीसराई, मुझफ्फरनगर, भोजपूर, शिखपूर, नावडा आणि दरभंगा येथे सुमारे शंभरजणांच्या जमावाने रस्ता रोको, रेल्वे रोको केला. तसेच बाजार बंद केला. उत्तर प्रदेशातील सहारणपूर, मुझफ्फरनगर, शामली आणि हापूर येथे सुरक्षेच्या दृष्टीने इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. फिरोजाबादमध्ये प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच मोठ्याप्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

अनेक राज्यांमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त
उत्तराखंडमधील नैनीतालमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते. जमावबंदी लागू असल्याने आंदोलनकर्त्यांना येथे काहीही करता आले नाही. मध्य प्रदेशात प्रशासनाने कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. तसेच जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. भोपाळसह बारा जिल्ह्यात सांयकाळी सह वाजेपर्यंत जमावबंदीचे हे आदेश लागू करण्यात आले होते. ग्वाल्हेर-चंपाबेल येथे 15 एप्रिलपर्यंत सहा हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तर इंटरनेट सेवाही मंगळवरी रात्री 10 पर्यंत बंद करण्यात आली होती. भींडमध्ये 11 एप्रिलपर्यंत संचारबंदी जारी करण्यात आली आहे. मागील भारत बंदचा अनुभव पाहता राजस्थानमध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.