जळगाव : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाजाकडून न्यायालयीन लढा सुरु आहे. याबाबत 2015 मध्ये 113 सबळ पुराव्यांसह 700 पानांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले असून आरक्षणाच्या न्यायालयीन लढा लढण्यासाठी निधी संकलनाचा ठराव धनगर समाजाच्या मेळाव्यात बहुमताने मंजूर करण्यात आला. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महा. मुंबईच्या जळगाव शाखेच्या वतीने रविवार 10 जून रोजी धनगर एस. टी. आरक्षण न्यायालयीन लढा प्रबोधन मेळाव्याचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
अनुसूचित जमातीत आरक्षणाची मागणी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसावळ महापारेषणचे अधिक्षक अभियंता जगन्नाथ चुडे उपस्थित होते. तर मेळाव्याचे उद्घाटन माजी महापौर सदाशिव ढेकळे यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यात सेवानिवृत्त पोलिस कमिशनर मधू शिंदे, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महा. मुंबईचे अध्यक्ष डॉ. जे. पी. बघेल, सेवानिवृत्त उपमहाप्रबंधक एमटीएनएललचे अॅड. मुरारजी पाचपोळ यांनी वैज्ञानिक व शास्त्रीय पद्धतीने राज्यातील धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण न्यायालयीन मार्गाने कसे मिळू शकते. तसेच हा न्यायालयीन लढा लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने हा निधी संकलीत करण्याचा ठराव मेळाव्यात बहुमताने मंजूर करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अहिलयादेवी समाज प्रबोधन मंच जळगाव शाखेचे अध्यक्ष चंद्रशेखर सोनवणे यांनी केले. तर आभार डी. बी. पांढरे यांनी मानले. मेळाव्याला उपविभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड, महानिर्मीतीचे अधिक्ष अभियंता एन. आर. देशमुख, ठाणे ग्रामीण जिल्हा सहनिबंधक व मुद्रांक जिल्हा अधिकारी दिपक पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल कुर्हाडे, पोलिस मुख्यालय कार्यालयीन अधिक्षक नागेश हडप्पे, महिला व बालविकास कल्याण अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह जिल्हाभरातील सुमारे दोनशेच्यावर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वितेसाठी चंद्रशेखर सोनवणे, राजेश देशमुख, धोंडू वाघ, एकनाथ सरोदे, भिकन पेंढारकर, शामकांत वर्डीकर यांनी कामकाज पाहिले.