आरक्षणासाठी ४० जणांनी जीव दिला; जल्लोष करण्याची वेळ नाही-अजित पवार

0

मुंबई –राज्य सरकारने आज मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले आहे. आरक्षणाचा विधेयक दोन्ही सभागृहात एकमताने संमत झाला. दरम्यान आरक्षण मंजूर झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई पाहायला मिळत आहे. यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ही श्रेय घेण्याची वेळ नाही. आपण आपली जबाबदारी पार पाडली आहे. परंतू, काही राजकारणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे चुकीचे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी ४० जणांनी आपला जीव दिला, त्यांचे बलिदान लक्षात ठेवायचे असते. त्यामुळे आज मी फेटा बांधला नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले. अजित पवारांनी आझाद मैदानात जाऊन आंदोलकांनी भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मराठा आरक्षणासाठी आम्ही ८ दिवसांपासून तगादा लावला होता. त्यामुळेच, आम्ही ८ दिवस सभागृह चालू दिले नाही, हेही तुम्हाला माहिती आहे. आज मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले. २८८ आमदारांनी एकमताने हे विधेयक पास केले आहे. त्यामुळेच, आरक्षणाची मागणी पूर्णत्वाला गेली, असे म्हणत या आरक्षणाचा श्रेय सर्वांचच असल्याचे अजित पवार यांनी आझाद मैदानात जाऊन तेथील उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर बोलताना सांगितले

मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी मुलांवर झालेल्या केसेस मागे घ्यावे अशी मागणी आम्ही केली. स्वत:चा जीव दिला त्यांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र, अद्याप ती मदत मिळाली असून ती लवकरात लवकर मिळावी, अशीही मागणी केल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले.