पुणे – माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंगांनी आरक्षणाचे विष पेरून ठेवले. मात्र आरक्षण जातीवर आधारित नव्हे, तर आर्थिक निकषावर दिले गेले पाहिजे असे मत राज ठाकरे यांनी पुण्यात व्यक्त केले. त्यांनी आज पुण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरुन सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. आज जाती-जातीवरुन विष पेरले जात आहे. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले, त्या महाराष्ट्राचे प्रबोधन करण्याची वेळ आली आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
नमाज पठण करायला लाऊडस्पिकर कशाला?
नमाज पठण करायला लाऊडस्पिकर कशाला हवा असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. नमाज पढायचा तर घरात पढा, असेही त्यांनी सांगितल्याने नवा वाद ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात येणाऱ्या खाजगी उद्योगातल्या ८० ते ९० टक्के नोकऱ्या स्थानिकांना दिल्या, तर आरक्षणाचा प्रश्नच राहणार नाही. मात्र आरक्षणावरुन फक्त राजकारण केले जात आहे. जाती-जातीचे हे विष इतके वाढत आहे. या महाराष्ट्राचा बिहार करायचा, उत्तरप्रदेश का झारखंड करायचा असा सवालही त्यांनी यावेळी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन फक्त राजकारण होत आहे. यांना फक्त तुम्हाला खेळवायचे आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीच्या मुलींनी मुलांनी याचा विचार केला पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. पर्युषणच्या काळात जैनमुनी कत्तलखाने बंद करण्याचे फतवे काढतात. मात्र तुम्ही तुमच्या धर्मासाठी काय करायचे ते करा, इतरांवर सक्ती कशाला असेही ते म्हणाले.