आरक्षित भूखंडाच्या फाइलवरील शेर्‍यात छेडछाड

0

मुंबई । आरक्षित भूखंडाच्या फाइलवरील शेर्‍यात छेडछाडप्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या लिपिकास अटक करण्यात आली आहे. मुंबईतील जोगेश्‍वरी परिसरातील एका वादग्रस्त भूखंडाच्या आरक्षण फाइलवरील आयुक्तांचा शेराच बदलण्याचा पराक्रम या लिपिकाने केला. या प्रकरणात वादग्रस्त भूखंडाबाबत उच्च न्यायालयाने वर्षभरात प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या संबंधित आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी हे प्रकरण घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाण्यासंदर्भातील शेरा फाइलवर केला होता. मात्र, वर्षभरानंतर तपासणीसाठी फाइल घेतली असता याच फाइलवर महानगरपालिका आयुक्तांच्या शेर्‍यात बदल करून सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये, असा शेरा आढळून आला.

या प्रकरणात गडबड आढळून आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने आझाद मैदान पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर या गुन्ह्यात मुंबई महानगरपालिकेचा लिपिक स्वप्निल पुराणिक याला अटक करण्यात आली. दरम्यान, मुंबईत भूखंड लाटणारे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पोलीस विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक चौकशी केली असता पोलिसांनी ज्ञानप्रकाश शुक्ला, निखिल ज्ञानप्रकाश शुक्ला, प्रभाकर शुक्ला, ब्रह्मदेव पांडे, सुभाष वाल्मीकी व स्वप्निल पुराणिक या आरोपींना अटक केली आहे.