रावेर– शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आगामी शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील 25 टक्के प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून 20 जानेवारीपर्यंत शाळांना यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी रावेर पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील पात्र शाळा मुख्याध्यापकांची सभा गट साधन केंद्रात झाली. तालुक्यातील 21 शाळा ज्यांना कायम विना अनुदानित व स्वयं अर्थ सहाय्यीत तत्वावर मान्यता मिळालेली आहे त्यांचा यात सहभाग होता. सभेत गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी मार्गदर्शन केले.
ऑनलाईन प्रवेशासाठी आवाहन
संबंधित शाळांनी शाळेची ऑनलाईन नोंदणी करावी, प्रवेश वेळापत्रक फळ्यावर प्रसिध्द करावे, नियमानुसार आर.टी.ई प्रवेशबाबत कार्यवाही करावी याबाबत सूचना देण्यात आल्या. पालकांना 24 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2018 या कालावधीत आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. प्रवेशाची पहिली सोडत 12 व 13 फेब्रुवारी 2018 या कालावधीमध्ये काढली जाणार आहे. आरटीई अंतर्गत गरीब घरातील मुलांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावे यासाठी सर्व शाळांमधील 25 टक्के प्रवेश राखीव ठेवले जात आहेत. या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाते.