आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची बेमुर्वतखोर रिक्षाचालकांवर कारवाई

0

कल्याण । कल्याण डोंबिवलीमध्ये प्रवाशांकडून वाढीव भाडे घेणे, दादागिरी करणे, बेकायदा रस्त्यावर रिक्षा पार्क करून वाहतूक कोंडी करणार्‍या बेमुर्वतखोर विरोधात कल्याण आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. एकीकडे ही कारवाई करणार्‍या पथकाची पाठ फिरताच कल्याण रेल्वे स्टेशन बाहेरील रस्त्यांवर रिक्षाचालकांची बेमुर्वतखोरी सुरूच आहे.

कल्याण आणि डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात रिक्षावाल्यांच्या वाढत चाललेल्या दादागिरीमुळे सर्व सामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत. हेच रिक्षावाले रस्त्यावर आडव्यातिडव्या रिक्षा पार्क करीत वाहतूक कोंडी निर्माण करतात. त्यामुळे सामान्य नागरीक, पादचारी आणि अन्य वाहनचालक त्रस्त आहेत. वाहतूक पोलीसांच्या अपुर्‍या संख्येमुळे अशा बेशिस्तपणे रिक्षावाल्यांना वठणीवर आणणे वाहतूक पोलिसांना शक्य होत नाही. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणार्‍या उन्मत्त रिक्षावाल्यांना वठणी आणण्याची प्रवाशीवर्गाची सातत्याने मागणी आहे. त्याची दखल घेत कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी बेमुर्वतखोर रिक्षाचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या. त्यानुसार आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली.

44 रिक्षा चालकांविरोधात दंडात्मक कारवाई
कल्याण पश्‍चिम, डोंबिवली पाठोपाठ कल्याण पूर्वेतील चक्की नाका, नेतवली नाका, काटेमानवली नाका परिसरात कल्याण पूर्व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. एन. जाधव आणि कल्याण आरटीओ विभागाचे मराठे, जोशी यांच्या पथकाने बेशिस्त रिक्षावाल्यांच्या विरोधात कारवाई केली. या संयुक्त कारवाईत दिडशेपेक्षा अधिक रिक्षावाल्यांची तपासणी करण्यात आली. यातील 44 रिक्षा चालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली गेली. गणवेश न घालणे, रिक्षांची कागदपत्रे न ठेवणे, 16 वर्ष जुन्या रिक्षा वापरणे, बेकायदा चौथी सीट घेऊन प्रवास करणे, रस्त्यावर रिक्षा पार्क करणे याविरोधात ही कारवाई केली गेली. त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालक पार हवालदिल झाले. चिंचपाडा, काटेमानवली, सिद्धार्थनगर, कोळशेवाडी, चक्कीनाका, नेतवली नाका परिसरातील अनेक रिक्षावाले कारवाईच्या भितीपोटी रस्त्यावरून काही काळ गायब झाले होते.