जळगाव। मोहाडी रस्त्यावरील मोहन नगरातील आरटीओ एजंटाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारीत 15 हजारांच्या रोकडसह बॅटरी चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली. याप्रकरणी आरटीओ एजंटाने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन नगरात आरटीओ एजंट काशिनाथ देविदास बाविस्कर (वय-40) हे पत्नी जयश्री व मुलगी भाग्यश्री यांच्यासोबत दुमजली घरात राहतात.
रविवारी 12 मार्च रोजी बाविस्कर हे रात्री 10.30 वाजेच्या सुमारास जेवन आटोपून खालच्या मजल्यावरील घराला कुलूप लावून वरच्या मजल्यावर पत्नी व मुलीसोबत झोपण्यासाठी गेले. यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाज्याचा कुलूप तोडून घरात प्रवेश करत रोकड व बॅटरी लंपास केली. 13 मार्च रोजी सोमवारी पहाटे 4 वाजेच्या नळाचे पाणी आल्यामुळे जयश्री यांना जाग आल्याने ते खालच्या मजल्यावर पाणी भरण्यासाठी आले. यावेळी त्यांना खालच्या मजल्यावरील घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी लागलीच पती काशिनाथ बाविस्कर यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. यावेळी दोघांनी घरात जावून पाहणी केल्यानंतर घरातील 15 हजार रुपयांची रोकड व बॅटरी चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी आज रविवारी चोरट्याविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.