आरटीओ कार्यालयाला मंदा म्हात्रे यांचा विरोध

0

नवी मुंबई । नेरूळ सेक्टर-19 येथे नियोजित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ.) च्या कामास बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी विरोध केला. स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे केलेल्या मागणीमुळे आमदार मंदा म्हात्रे यांनी सदर ठिकाणी दौरा करून तेथील कार्यालयाला विरोध दर्शवून सदर ठिकाणी आर.टी.ओ. कार्यालय होऊन देणार नाही, अशी ग्वाही दिली. वाशी येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असून सर्व कामकाज एकाच ठिकाणी होत असल्यामुळे अजून एक स्वतंत्र कार्यालय असावे, याकरिता नेरूळ सेक्टर-19 येथे नियोजित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय करिता भूखंड उपलब्ध करण्यात आला. परंतु या भूखंडाशेजारील सेवारस्ता हा अतिशय लहान असल्यामुळे तसेच समोरच वंडर्स पार्क उद्यान असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. आजूबाजूच्या परिसरात शाळा-कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही सदर परिसरात असंख्य प्रमाणात आहे. त्यामुळे तेथील स्थानिक जेष्ठ नागरिक तसेच महिलांनी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना सदर आर.टी.ओ. कार्यालय न होणेबाबत निवेदनाद्वारे मागणी केली.

याच अनुषंगाने आमदार मंदा म्हात्रे यांनी सदर ठिकाणी दौरा केला असता सदर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय झाल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतील. वाहनांची संख्या वाढल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढेल. तेथील स्थानिक नागरिक व महिलांचा आक्रोश ऐकताच सदर ठिकाणचे काम तत्काळ बंद करण्यात आले. तसेच वाशी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांजबरोबर चर्चा करून सदर कार्यालयासाठी वेगळे ठिकाण देण्याचे आश्‍वासन आमदार मंदा म्हात्रे यांनी अधिकार्‍यांना दिले. यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह विजय घाटे, सुनील होनराव, दर्शन भारद्वाज तसेच असंख्य स्थानिक नागरिक व महिला वर्ग उपस्थित होते.