बारामती । न्यायालयीन आदेशानुसार वाहनांच्या योग्यताप्रमाण पत्रांची तपासणी 250 मीटरच्या ब्रेकटेस्ट ट्रॅकवर करणे बंधनकारक आहे. परंतु, बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास ब्रेक टेस्ट ट्रॅक नसल्याने गेल्या चार महिन्यांपासून वाहनांच्या योग्यताप्रमाण पत्रांच्या तपासणीचे काम बंद होते. मेडद येथे जागा उपलब्ध झाल्यानंतर तेथे ब्रेकटेस्ट ट्रॅक तयार करण्यात आला. या ठिकाणी डिसेंबर 2017 पासून दररोज 20 वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रांच्या वाहनांची तपासणी सुरु करण्यात आली. तर जानेवारी 2018 मध्ये त्यामध्ये वाढ करून 25 वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. परंतु, गेल्या चार ते पाच माहिन्यांपासुन वाहनांच्या योग्यताप्रमाण पत्रांची तापासणी रखडली आहे.
फक्त 25 वाहनांची तपासणी
न्यायालयाच्या आदेशानुसार दररोज एक मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, असे दोघे मिळून 30 वाहनांची तपासणी करू शकतात. तसेच अत्यावश्यक सेवेमध्ये येणारी ऍम्ब्युलंस, दूध टँकर, पेट्रोल टँकर, डिझेल टँकर, स्कूल बस या वाहनांची तपासणी तत्काळ करून देणे कायद्यानेही बंधनकारक आहे. मात्र, परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक फक्त 25 वाहनांची तपासणी करून हात झटकण्याचे काम करीत आहेत.
तपासणीसाठी अधिकार्यांच्या सोयीची वेळ
दररोज अपॉयमेंट घेतल्यापैकी 25 वाहन चालक-मालक येत नाहीत किमान 4 ते 5 वाहने तरी कमीच असतात, तरीही रोजच्या तपासणी कामाचा कोटा पुर्ण केला जात नाही. या उलट मोटार वाहन निरीक्षक वाहने तपासणीचे काम लवकर बंद करतात. शासकीय वेळेनुसार वाहनांच्या योग्यताप्रमाण पत्रांची तपासणी करण्याचे काम मेडद येथील ब्रेकटेस्ट ट्रॅकवर सकाळी 9 वाजून 45 मिनिटांपासून ते सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांपर्यंत होणे बंधनकारक आहे, असे असूनही मोटार वाहन निरीक्षकांनी मात्र आपल्या सोयीनुसार ही वेळ दुपारी 12 व त्यानंतरची ठेवत आहेत.
वाढीव खर्च परवडतो
काही सधन वाहन मालक तपासणी करण्यासाठी राज्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापुर, अकलूज, नांदेड, श्रीरामपुर, अहमदनगर, सातारा, कराड, पुणे, पिपरी चिंचवड अशा अनेक ठिकाणी जातात. परंतु, याकरिता इंधनाचा तसेच अन्य खर्च वाढतो. परंतु, बारामती वगळता अन्यत्र 20 मिनीटांत वाहन तपासणी पत्र मिळत असल्याने हा वाढीव खर्च परवडत असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे.