प्रा.धीरज पाटील यांचा पाठपुरावा ; मनमानी करणार्या शाळांना लागणार चाप
भुसावळ:- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांच्या मुलांना आरटीईच्या अंतर्गत मोफत प्रवेश मिळणे कायद्यानुसार बंधनकारक असताना शहरासह भुसावळ विभागातील काही शाळांनी मनमानी चालवल्याने नियम धाब्यावर बसवून मनमानी सुरू केल्याने या संदर्भात भुसावळातील प्रा.धीरज पाटील यांनी स्थानिक स्तरासह मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या तक्रारीची दखल घेत चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांना मिळाल्याने लवकरच या शाळांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत.
अनेक शाळांचा नियमांना ‘खो’
आरटीई कायदा कलम 12 (2 ) नुसार संबंधित सगळ्या शाळा मुलांना मोफत शिक्षण, तसेच गणवेश, पाठयपुस्तके देण्यास बांधील असताना गतवर्षी स्वतःचा मनमानी कारभार सुरू ठेवला होता. याबाबत वारंवार शिक्षण विभाग यांच्या हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. जिल्ह्यातील तीन हजार 817 जागांसाठी एकूण पाच हजार 236 जणांनी अर्ज नोंदणी केली आहे तर संस्था चालकांकडून प्रवेशावेळी पालकांनी परीपूर्तीची रक्कम मिळणेबाबत लेखी पत्र शिक्षण विभागाकडून लिहून आणण्याची अट ठेवण्यात आली आहे म्हणजे पालकच बळी ठरणार आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेना असे कदापी घडू देणार नाही, असे शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
पालकांना संपर्क साधण्याचे आवाहन
भुसावळ तालुक्यात मागील गत वर्षात आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जर विनामूल्य शैक्षणिक साहित्य, वह्या, पुस्तके गणवेश व इतर साहित्य मिळालेले नसेल अश्या सर्व पालकांनी शिष्ट मंडळाचे सदस्य प्रा.धीरज गणेश पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.