फडणवीस यांच्या जागी इतर कोणी असते तरीही त्यांना ते करावेच लागले असते. हा निर्णय सरकारचा
महापालिकांचे निकाल दैवी चमत्कार नसून सत्ता व पैशांचाच खेळ आहे हे गिरीशभाऊंइतके दुसरे कोणाला समजणार?
जळगाव । मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांना अडचणींमधून मार्ग काढण्याची दैवी शक्ती प्राप्त झाली आहे, असे म्हणणार्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे खास भगतगण गिरीश महाजन यांनी अशी पंचारती ओवाळली आहे की जगातील सर्व जंतरमंतर, जादूटोणावाले भूमिगत झाले आहेत, असा टोला लगावत महाजन यांच्यासारख्या ’आरतीबाज’ लोकांपासून मुख्यमंत्र्यांनी सावध राहायला हवे, असा सल्लाही ठाकरेंनी दिला.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाजन यांनी स्तुतिसुमनं उधळली होती. अडचणींतून सहज मार्ग काढण्याची दैवी शक्ती मुख्यमंत्र्यांकडे आहे, असं महाजन म्हणाले होते. तोच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून महाजनांवर टीका केली आहे. गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने अंगारे-धुपारे उडवले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनवाले नरेंद्र दाभोलकर यांचा आत्माही आता सांगत असेल, माझे खुनी पकडू नका! मुख्यमंत्र्यांनी अशा आरतीबाज लोकांपासून सावध राहिले पाहिजे, त्यांच्या प्रतिमेस हे शोभणारे नाही. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामुळे राज्यातील महानगरपालिकांचे निकाल भाजपच्या बाजूने लावून घेतले हा दैवी चमत्कार नसून सत्ता व पैशांचाच खेळ आहे हे गिरीशभाऊंइतके दुसरे कोणाला समजणार? असा चिमटा देखील त्यांनी काढला आहे. महाजनांसह एकनाथ खडसेंवर देखील निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते व त्यानंतर महाराष्ट्राचे प्रमुख मंत्री असताना तेदेखील अंगात संचारल्यासारखेच वागत-बोलत असत, पण फडणवीस यांनी खडसे यांची ‘पॉवर’ काढून घेताच त्यांच्यातील दैवी संचारही संपला व ते आता मुक्ताईनगरात वाती वळत बसले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ‘पॉवरबाज’ आशीर्वादाचा हात गिरीश महाजन यांच्या खांद्यावर ठेवल्याने त्यांनाही आज संचारल्यासारखे वाटत असावे, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
आरक्षण नाकारणे ब्रम्हदेवालाही शक्य नव्हते
देवांना आणि नेत्यांनाही त्यांचे भगतगण अडचणीत आणीत असतात. वर नरेंद्र व खाली देवेंद्र यांच्या बाबतीत हेच घडताना दिसत आहे. भाजपच्या एका प्रवक्त्याने मागे नरेंद्र मोदी हे विष्णूचे तेरावे अवतार असल्याचे जाहीर करून खुशामतखोरीचे शिखर गाठले होते. आता देवेंद्र महाराजांना मखरात बसवून त्यांची आरती सुरू झाली आहे. मराठयांना १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिमतीने घेतला. त्यास सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमताने पाठिंबा दिला. मुळात ज्या प्रकारचा सामाजिक, राजकीय दबाव राज्यात मराठा समाजाने निर्माण केला होता तो पाहता त्यांना ‘आरक्षण’ नाकारणे किंवा खोळंबून ठेवणे ब्रह्मदेवालाही शक्य नव्हते. फडणवीस यांच्या जागी इतर कोणी असते तरीही त्यांना ते करावेच लागले असते. हा निर्णय सरकारचा, संपूर्ण मंत्रिमंडळाचा होता. त्यामुळे महाजन यांनी जे दैवी अवताराचे भाष्य केले ते हास्यास्पद ठरते, अशी खरमरीत टीका देखील उध्दव ठाकरे यांनी केली आहे.