प्रांताधिकार्यांचे आदेश; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई
भुसावळ- रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याने भुसावळातील राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. भुसावळचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी याबाबत बुधवारी आदेश काढले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणार्या उपद्रवींविरुद्ध हद्दपारी तसेच प्रतिबंधात्मक कारवाईसंदर्भात पोलिस प्रशासनाने नियोजन केले होते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उपद्रवींविरुद्ध प्रांताधिकार्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या अनुषंगाने सर्व बाबींची पडताळणी झाल्यानंतर राजू सूर्यवंशी यांना दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश बुधवारी काढण्यात आले आहेत. गुरुवारी लागलीच बाजारपेठ पोलिसांकडून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
लवकरच अन्य उपद्रवींवर कारवाई
भुसावळ विभागातून हद्दपारीबाबत सुमारे आठ प्रस्ताव सादर झाले असून त्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू. येत्या एक-दोन दिवसात हद्दपारीसह एमपीडीएची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.