आरोग्याची पंचसूत्री वापरून कोरोनाला रोखणे शक्य

0

शिंदखेडा:जागतिक स्तरावर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जनता त्रस्त झाली असतांना आपण आरोग्याची पंचसूत्री वापरून या रोगाला रोखू शकतो, असे प्रतिपादन राज्य राखीव दल धुळे येथील बल गट क्रमांक 6चे समादेशक संजय पाटील यांनी केले.

शिंदखेडा येथील लक्ष्मीनारायण कॉलनी परिसरात त्यांच्या गटातर्फे होमिओपॅथीच्या गोळ्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. शिंदखेडा येथील विरोधी पक्षनेते नगरसेवक सुनील चौधरी, शिरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्यामकांत ईशी, शहर तेली युवक आघाडी यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चौधरी यांच्यातर्फे मास्क वाटप करण्यात आले.

होमिओपॅथी औषधाच्या अर्सेनिक अल्बम या गोळ्यांचा योग्य वापर करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी, असे आवाहन राज्य राखीव दलाच्या अविनाश चंद्रा यांनी केले. संजय पाटील यांनी कोरोनाशी अजुन किती दिवस लढावे लागेल हे अनिश्चित आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापर, व्हीटामिन सीचा जास्त वापर, साबणाचा वापर या गोष्टी त्यामुळे स्वतःहून आत्मसात करावे लागतील. शासन आज ना उद्या सर्व व्यवहार, शाळा महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेईल. त्यावेळी स्वतःहून काही गोष्टींची सवय लावून घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले.

कार्यक्रमास माजी सभापती प्रा. सुरेश देसले, पो.नि.दुर्गेश तिवारी, नगरसेवक दीपक अहिरे, उदय देसले, कॉलनी परिसरातील महिला, पुरुष सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संयोजनासाठी तेली समाज युवक आघाडी, श्री जी प्रतिष्ठान, लक्ष्मी नारायण मित्र मंडळ, जय संताजी युवा मंच, स्वामी विवेकानंद बहुद्देशीय मंडळ, संकेत मराठे, रवि पाटोळे, निखिल पाटील, अभिषेक, यांनी परिश्रम घेतले. आभार नगरसेवक सुनील चौधरी यांनी मानले.