पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – आरोग्य विभागाच्या सर्वाधिक तक्रारी आल्याने अखेरीस सहायक आयुक्त विजय खोराटे यांच्याकडील आरोग्य कार्यकारी अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आला आहे. आता आरोग्य विभागाची सूत्रे प्रशासन अधिकारी मनोज लोणकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. याबाबतचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.
कचरा समस्या सोडविण्यात अपयश
महापालिकेत सत्तांतर घडल्यांनतर गेल्या नऊ महिन्यात कचरा कोंडीने भाजप पदाधिकारी अक्षरश: जेरीस आले. साफसफाई करणारे ठेकेदार राष्ट्रवादी धार्जिणे असल्याचा भाजपचा आरोप तर न्यायप्रविष्ठ बाब यामुळे कचरा समस्या अधिकच उग्र बनली. त्यातच कोल्हापूर महापालिकेतून पिंपरी महापालिका सेवेत प्रतिनियुक्तीवर आलेले उपजिल्हाधिकारी विजय खोराटे यांना आरोग्य विभाग पेलवला नाही. आरोग्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे असताना कचरा समस्या सोडविण्यास अपयशी ठरल्याने सत्ताधार्यांची त्यांच्यावर खप्पामर्जी ओढविली. त्यातच मोबाईल कॉल न घेणे, वारंवार सुटीवर जाणे या तक्रारींमुळे आयुक्तच मेटाकुटीस आले.
फक्त भूमी व जिंदगी विभागाची जबाबदारी
या पार्श्वभुमीवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहायक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप केले आहे. आरोग्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे प्रशासन अधिकारी मनोज लोणकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. त्यांच्याकडे क्रीडा विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. सहायक आयुक्त योगेश कडुसकर यांच्याकडील आकाशचिन्ह व परवाना विभागाचा कार्यभार काढून घेत त्यांची रवानगी ’फ’ क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे झोपडपट्टी पुनर्वसन आणि निर्मुलन विभागाचा पदभार सोपविण्यात आला आहे. तर विजय खोराटे यांच्याकडे केवळ भूमी आणि जिंदगी विभाग ठेवण्यात आला आहे.