आरोग्य अधिकार्‍यांची धडक कारवाई

0

जळगाव। शहरात स्वच्छता होत नसल्याने आरोग्य अधिकारी यांची स्थायी समिती सभेत आयुक्त, सदस्यांनी चांगलीच झडाझडीती घेतली होती. आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी शनिवारी सकाळी सहा वाजता शहरातील दैनंदिन स्वच्छतेच्या बाबत पाहणी करण्यास सुरू केली. दुपारपर्यंत साफसाईच्या कामात कामचुकारपणा करणारे कर्मचारी, आरोग्य निरीक्षक, तसेच मक्तेदार व उघड्यावर वैद्यकीय कचरा फेकणार्‍या डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शुक्रवारी स्थायी समितीची सभेत सदस्यांनी आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त करत डॉ. पाटील यांना चांगलेच धारेवर धरले होते. मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी थेट आरोग्य अधिकार्‍यांचे पाय पकडले होते. आज सकाळी सहा वाजल्यापासून आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांनी युनिट क्रमांक 7 पासून स्वच्छतेच्या तपासणीला सुरवात केली. यात ड्यूटीच्या वेळेत हजर नसलेले आरोग्य निरीक्षक, सफाई कर्मचार्‍यांना यांना हजार ते दोनशे रुपये दंड करण्यात आला. तसेच गटारी साफ न करणे, ठरवलेल्या कचरा स्पॉटवरील कचरा न उचलणे, काम न करता कर्मचारी बसलेले, रस्त्याची साफ सफाई न करणे याबाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली.

मुकदाम, आरोग्य निरीक्षक होणार निलंबित
वॉर्ड क्रमांक 15 स्वच्छ भारत अभियान अंतर्गत काम न करणे, तसेच जागो जागी कचरा आढळणे व दैनंदिन स्वच्छतेबाबत निष्काळजी करणारे मुकादम मुकेश थांबते, आरोग्य निरीक्षक श्री. भट यांना आरोग्य अधिकारी डॉ. पाटील हे निलंबित करणार आहे. तसेच या वॉर्डातील खंडेराव नगरात खंडेराव महिला बचत गटाच्या ठेकेदाराला गटारी साफ सफाई न केल्याने दिड हजाराचा दंड आकारण्यात आला. स्वच्छतेच्या पाहणीत आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांना विसनजीनगर येथील मंन्साई रुग्णालयाच्या बाहेर बायोमेडिकल वेस्ट कचरा टाकलेला आढळला. त्यामुळे रुग्णालयाचे डॉ. राजीव नारखेडे यांना तीन हजार रुपयांचा दंड आरोग्य अधिकारी यांनी आकारला. बायोमेडिकल वेस्ट कचरा उघड्यावर टाकू नये अन्यथा कारवाई करु असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

गोलाणी मार्केट स्वच्छ
महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांतर्फे आज गोलाणी मार्केटमधील स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सर्व कचरा कुंड्यामधील कचरा देखील उचलण्यात आला. तसेच चहा विक्रेत्यावर प्लॅस्टिक कप रस्त्यावर फेकल्याने पाचशे रुपयांचा दंड आकारला असून या पुढे चहा विक्रेते तसेच अन्य रस्त्यावरील विक्रेत्यांनी कचरा रस्त्यांवर फेकल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आरोग्य अधिकारी यांनी दिला आहे. आरोग्य अधिकार्‍यांच्या या पवित्र्यामुळे विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे.

या कर्मचार्‍यांवर दंडात्मक कारवाई
युनिट क्रमांक 7 आरोग्य निरीक्षक एम. के. खान तसेच सफाई कामगार नंदा जावळे, संगीता तायडे, सुनील नाडे, सदाशीवर अंभोरे, हे ड्युटीच्या वेळेनुसार हजर नसल्याने कारवाई. युनिट दहा मध्ये संजय ढंढोरे, सफाई कर्मचारी ज्योती धवलपूरे, आशा सकर, माया नन्नवरे, मंगला राकपसरे, रामेश्‍वर कॉलनीत मुकादम किशोर भोई, सफाई कर्मचारी दिपक चांगरे, अरुण बिर्‍हाडे, देवचंद नाडे, अभिमान डोंगरे यांच्यावर कारवाई, वॉर्ड क्रमांक 12 मध्ये पंकज वाघ स्वयंरोजगार संस्थेच्या मक्तेदार, पिंप्राळा परिसरात गटारी तुंबलेल्या, कचरा न उचलणे, रस्त्याची सफाई न केल्याने रामदेव बाबा मेहतर समाज मागास वर्गीय संस्थेच्या मक्तेदार यांना दंड आकारण्यात आला.