आरोग्य कर्मचार्‍यानंतर सुरक्षा कर्मचार्‍यालाही कोरोनाची लागण

0

शिरपूर:शहरात आरोग्य कर्मचार्‍यानंतर सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या कर्मचार्‍यालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बुधवारी रात्री उशिरापर्यंत आलेल्या कोरोना तपासणी अहवालात चार कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एका सुरक्षा कर्मचार्‍याचा समावेश आहे. आरोग्य कर्मचार्‍यानंतर आता सुरक्षा कर्मचार्‍यालाही कोरोनाची लागण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन व उपजिल्हा रुग्णालयातील दोन असे चार तपासणी अहवाल हे 10 रोजी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शिरपूर शहरातील वरवाडे येथील 26 वर्षीय व अंबिकानगर येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत आलेल्या अहवालात शहरातील नाथ नगर आणि अंबिका नगर येथील प्रत्येकी एक पुरुषाचा समावेश आहे. त्यात एका सुरक्षा कर्मचार्‍याचा समावेश असल्याची सूत्रांद्वारे माहिती मिळाली आहे. आरोग्य कर्मचार्‍यानंतर सुरक्षा विभागाच्या कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याने शहरात कोरोनाची दहशत कायम वाढत आहे. आतापर्यंत तालुक्यात 83 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात 7 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असुन 36 रुग्णांनी कोरोनावर मात करीत आपल्या घरी परतले आहे.