अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांची नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वित्त व लेखा समितीवर निवड करण्यात आली आहे. आगामी पाच वर्षांच्या कालावधीसाठी डॉ. देशमुख या समितीवर कार्यरत असणार आहेत.
राज्यभरातील सहा केंद्रांच्या माध्यमातून नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा कारभार चालतो. विद्यापीठ आणि त्याअंतर्गत येणारी सर्व केंद्रे, महाविद्यालये यांच्या वित्तविषयक बाबी हाताळणे, त्याविषयी निर्णय घेणे तसेच बांधकाम, मशिनरी आदी महत्वाच्या आर्थिक तरतुदींसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे काम हि समिती करते. प्रचंड मोठा आवाका असलेल्या या त्रिसदस्यीय समितीवर डॉ. सुधीर देशमुख, डॉ. अजित गोपचाडे आणि वैद्य श्रीराम सावरीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील नियुक्तीपत्र विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे. आगामी पाच वर्षांसाठी हि नियुक्ती असणार आहे. या नियुक्तीबद्दल डॉ. सुधीर देशमुख यांच्यावर अंबाजोगाईकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
उपकेंद्रसाठी प्रयत्न करणार
“आरोग्य विद्यापीठाकडून प्रथमच एवढी मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मिळालेल्या संधीच्या माध्यमातून अंबाजोगाई, नांदेड, लातूर, सोलापूर या महाविद्यालयासाठी अंबाजोगाई येथे विद्यापीठाचे उपकेंद्र निर्मितीसाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे.” डॉ. सुधीर देशमुख