वरणगाव । मागील पंधरवाड्यापासून येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्याने ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. त्यामुळे शहर व परिसरातील गरजू व गोरगरीब रूग्णाचे उपचाराविना हाल होत असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात जास्तीचे पैसे भरुन उपचार करण्याची वेळ आली आहे. यामुळे या रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शहरातील विविध पक्षांच्या पदाधिकार्यांनी व रूग्णकल्याण समितीने वैद्यकिय विभागाच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे. वरणगांवसह ग्रामीण विभागाची लोकसंख्या जवळपास 2 लाख असून गरीब शेतकरी, कष्टकरी मजुरांच्या संख्येचे प्रमाण अधिक आहे. त्यात शहरातून गेलेला महामार्ग आणि जवळच रेल्वे लोहमार्ग वाहतूकीमुळे अपघाताच्या प्रमाणात नित्याची वाढ असल्याने अपघातातील मृतांच्या शवविच्छेदनाच्या अहवाल प्रश्न आदी सर्व शासकिय बाबीविषयी वैद्यकिय अधिकार्यांची गरज भासत आहे.
अधिकार्यांचे दुर्लक्ष
मात्र येथील वैद्यकिय आधिकारी डॉ. हर्षल चांदा यांच्या निष्काळजी व निष्ठुरपणामुळे ग्रामीण रुग्णालयाची पूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडली असुन रुग्ण तपासणी एकवेळ करुन कारभार आटोपत्ता घेत असल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण रूग्णालयाच्या कार्य व्यवस्थेकरीता शासन स्तरावरून कर्मचारी पाठबळ व्यवस्थीत आहे. मात्र याठिकाणी त्याचे योग्य नियोजन करण्यात येत नसल्यामुळे वैद्यकिय सेवा विस्कळीत होत असते. यामुळे शहरासह परिसरातील गोरगरीब रुग्णांचे हाल होत असून जिल्हा प्रशासनाने याबाबींकडे लक्ष देऊन वैद्यकिय अधिकार्यांना सुचना देण्याची आवश्यकता आहे.
शालेय तपासणीच्या परीचारीकांना करावी लागते रुग्णसेवा
येथील डॉ. हर्षल चांदा यांनी ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणीकरीता सकाळी 9 ते 12 पर्यंत आरबीएसकेच्या शालेय तपासणीच्या विविध डॉक्टरांकडून वरिष्ठांच्या आदेशाने पथकाकडून पहील्या सत्रात रुग्णांची तपासणी पार पाडली जात आहे. आणि ग्रामीण रुग्णालयात सात परिचारीकांची नियुक्ती असतांना शालेय तपासणीच्या परीचारीकांना रूग्णसेवा करावी लागत आहे. शासन स्तरावरून ग्रामीण रुग्णालयांची बाह्यरुग्ण तपासणी सकाळी 9 ते 12 दुपारी 4 ते रात्री 8 पर्यंत दोन
सत्रांमध्ये रुग्ण तपासणी आहे.
कायम कर्मचार्यांची मनमानी
रुग्णालयात भरलेल्या खाजगी ठेकेदारीतील कर्मचार्यांवर अतिरिक्त सेवेचा भार पाडून कायम सेवेतील कर्मचारी दांड्या मारण्यात गर्क आहेत. कायम असलेल्या कर्मचार्यांना कुणाचाही धाक उरलेला दिसून येत नाही. त्यामुळे त्यांचा मनमानी कारभार याठिकाणी सुरु आहे. याकरीता येथील विविध राजकिय पक्षांच्या पदाधिकार्यांनी व ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णकल्याण समितीच्या पदाधिकार्यांनी शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ते पाऊले उचलुन आरोग्य विभागाच्या सचिवालयाकडे गंभीर समस्येबाबते पाठपुरावा करण्याची शहरवासीयांकडून मागणी होत आहे.