धुळे । डॉ.माधुरी बोरसे व भाजप आझाद नगर मंडळातर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन निरामय हॉस्पिटल येथे करण्यात आले होते. शिबिरात एकूण 3654 रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी, साहेबाचंद जैन, रवी बेलपाठक, चंद्रकांत गुजराथी, जयश्री अहिरराव, फिरोझ लाला, रत्नाताई बडगुजर, अनिल थोरात, भारतीताई माळी, प्रतिभा चौधरी, केदार मोराणकर, वैशाली शिरसाठ आदी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात ना.भामरे यांनी डॉ.माधुरी बोरसे, डॉ.विपुल बाफना यांच्या 15 वर्षातील वैद्यकीय सेवेबद्दल गौरवोद्गार काढले.
वेळेवर उपचार व्हावे
डॉ.माधुरी बोरसे यांनी दरवर्षी अनेक रुग्ण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे उपचाराभावी दगावतात, अनेकांना आपली घर व शेती गहाण ठेऊन उपचार घावे लागतात. ह्यामुळे अनेक लोक दारिद्य्राच्या रेषेखाली दरवर्षी येतात. जीवनदायी योजना गेल्या 5 वर्षांपासून राज्यात सुरु आहे, तरी देखील लोकांमध्ये जागृती नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार वेळेवर होऊ शकत नाहीत. संपूर्ण शहरात, प्रत्येक विभागात अशी आरोग्य शिबीर घेणार असल्याचे सांगितले.
साहित्य वाटप
शिबीरात कॅन्सर, हृदय रोग, अस्थिरोग- मणकेविकार, फ्रॅक्चर, सांधे विकार, स्त्रीरोग, बालरोग, मूत्रविकार- मुतखडा, प्रोस्टेट, किडनीविकार-डायलेसिस, मानसिक रोग, मेंदूविकार, श्वसनविकार, क्षयरोग, कान नाक घसा, दंतरोग, त्वचा रोग आदी विकारांवर तपासणी करण्यात आली. शिबिरात गरजू रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. 81 रुग्णांना कानाचे मशीन, हृदय विकाराचे एकूण 54 रुग्णांची अँजिओग्राफीसाठी निवड, 18 रुग्णांवर कॅन्सरची शस्त्रक्रिया, 72 रुग्णांवर मूत्रमार्गातील आजारांवर उपचारासाठी, 18 रुग्णांवर डायलेसिससाठी, 9 लहान मुलांची शस्त्रक्रीयेकरीता तर 36 रुग्णांची मणक्यांचे शस्त्रक्रियासाठी निवड करण्यात आली आहे.