आरोपांनीच राज्य सरकार ‘डॅमेज’ ; त्यावर आता कंट्रोलची गरज
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस : मुक्ताईनगरसह रावेर तालुक्यात नुकसानीची केली पाहणी
रावेर : विविध आरोपांमुळेच राज्य सरकार ‘डॅमेज’ झाले असून त्यावर आता कंट्रोलची गरज असल्याने सरकारने त्याकडे आता अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. जिल्ह्यातील काही पालिकांमधील नगरसेवकांनी सेनेसह राष्ट्रवादीत केलेल्या प्रवेशानंतर भाजपात डॅमेज कंट्रोल करणार का? या प्रश्नावर फडणवीस बोलत होते. सोमवारी राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांची त्यांनी भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना वेग आला मात्र ही भेट केवळ तब्येतीची विचारणा करण्यासाठी होती त्यामुळे त्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करू नका, असेही फडणवीस म्हणाले.
स्व.हरीभाऊ जावळे समितीचे निकष कायम ठेवावेत
देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिवसभर मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी बागांची पाहणी केली. ते म्हणाले की, पीक विमा कंपनीने सरसकट शेतकर्यांना भरपाई द्यावी मात्र विमा कंपनी विविध मुद्दे उपस्थित करून अडचणी निर्माण करत आहे. ज्या शेतकर्यांचा विमा नाही त्यांनादेखील सरकारने मदत करण्याची आवश्यकता आहे. आमचं सरकार होतं त्यावेळी ज्यांचा विमा नव्हता त्यांनाही 50 टक्के रक्कमेचा विमा काढला, असं समजून त्या काळात दिली होती. आता विम्याची रक्कम मिळताना अडचण होत आहे. मागील काळात तत्कालीन आमदार स्व.हरीभाऊ जावळे यांची एक समिती आम्ही तयार केली होती आणि हरीभाऊ जावळे समितीने केळीच्या संदर्भात विम्याचे निकष ठरवून त्यावेळेस आपण तसं टेंडर काढलं होतं आणि त्यावर्षी विमा कंपन्यांनी चांगला पैसा शेतकर्यांना दिला. मात्र गतर्षी स्व.जावळे समितीचे सर्व निकष बदलवण्यात आले आणि नव्या निकषाने केळीच्या विम्याचा हा टेंडर काढला गेला. त्यामुळे विमा कंपन्यांचा आता अधिक फायदा होत आहे. स्व.हरीभाऊ जावळे समितीचे जे निकष होते, त्या निकषानुसारच या ठिकाणी केळीचा विमा उतरवावा व त्यानुसार शेतकर्यांना भरपाई मिळावी, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.
केळी करपाचे अनुदान सुरू करण्यासाठी प्रयत्न
शिवसेना प्रवक्ते संजय राऊतांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, त्यांची अवस्था घर का ना घाट का सारखी झाली असून राज्य सरकारला कोकणाकडे लक्ष द्यायला वेळ आहे मात्र केळी पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकर्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असेही फडणवीस म्हणाले.
केळी करपाचे अनुदान आमचे सरकार असतांना मिळत होते मात्र आत्ताच्या राज्य सरकारने ते बंद केल्याने ते पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.
मेंढोदेमध्ये साधला ग्रामस्थांशी संवाद
मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढोदे गावात चक्रीवादळामध्ये तब्बल 223 घरांचे नुकसान झाले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गावाला भेट देवून नुकसानाची माहिती घेतली. यावेळी सरपंच सोपान सपकाळे यांनी पूर्नवसीतांसाठीची जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात देवून 100 घरांचे पुर्नवसन करावे, प्रती स्केअर फुटची वाढविलेल्या प्लॉटची किंमत कमी करावी, अशी मागणी केली.
पाहणी दौर्यांत यांचा सहभाग
रावेर तालुक्यातील दौर्यात माजी मंत्री गिरीष महाजन खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंदू पटेल, आमदार संजय सावकारे, जिल्हा परीषद अध्यक्षा रंजना पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, डॉ.राजेंद्र फडके, जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन, सुरेश धनके, पं.स.सभापती कविता कोळी, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, संदीप सावळे आदी भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी होते. प्रशासनातर्फे प्रांतधिकारी कैलास कडलग, उप विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गट विकास अधिकारी दीपाली कोतवाल, सहा.निरीक्षक स्वप्निल उन्नवणे सहभागी होते.
फडणवीस मुक्ताईनगरात तर नाथाभाऊ मुंबईत
फडणवीस यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या कोथळी येथील घरी सकाळी 11 वाजता सदिच्छा भेट दिली मात्र माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे हे सोमवारीच मुंबईत गेल्याने उभयंतांची भेट टळली असलीतरी विरोधी पक्ष नेत्यांनी खडसेंच्या घरी दिलेल्या भेटीनंतर राजकीय गोटात विविधांगी चर्चा सुरू झाल्या. फडवणीस यांचे आगमन झाल्यानंतर भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी त्यांचे स्वागत केले. खासदार रक्षा खडसे या भाजपाकडून निवडून आल्या असून त्यांनी चहासाठी आग्रह केल्याने भेट दिल्याचे फडणवीस म्हणाले.