आरोपी न करण्यासाठी 15 हजारांची लाच मागणारा एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

0

अत्याचार प्रकरणातील आरोपी आदेशबाबाला पकडण्यात आरोपी पोलिसाने बजावली होती महत्वाची भूमिका

जळगाव- अत्याचार प्रकरणातील आरोशी आदेशबाबाला पकडण्यात महत्वाची भूमिका बजावणार्‍या जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल संदीप भगवान पाटील यास 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी जळगाव एसीबीने सापळा रचून अटक केली. विशेष म्हणजे दोन आठवड्यांपूर्वीच याच पोलिस ठाण्याचे हवालदार दयाराम देवराम महाजन यांनाही लाच मागणी प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर सलग दुसरी कारवाई झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी मागितली लाच
बळीराम पेठ परीसरातील बुट व चप्पल दुकानाच्या गोदामातून 10 लाखांचा माल चोरीला गेल्यानंतर या गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी 26 वर्षीय तक्रारदार याच्याकडे आरोपी संदीप पाटील यांनी 6 नोव्हेंबर रोजी 15 हजारांची मागणी केली होती. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्याने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक जी. एम. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नीलेश लोधी यांनी सापळा रचून पोलिस कॉन्स्टेबल संदीप पाटील याला रंगेहात पकडले. त्याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात लाच प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.