आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांकडून 50 टक्के शिक्षण शुल्क घ्या!

0

मुंबई । राज्यातील अनेक शिक्षण संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देताना 100 टक्के शिक्षण शुल्क भरण्याचा आग्रह धरतात. 100 टक्के शुल्क भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही. याबाबत सरकारकडे विद्यार्थ्यांकडून, पालकांकडून, विविध संघटनांकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून तक्रारी आल्यानंतर शासनाने निर्णय जारी करून संस्थाचालकांना 50 टक्के फी घेण्याबाबत तंबी दिली आहे. शिक्षण संस्थांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची संपूर्ण रक्कम भरण्यासाठी आग्रह केल्यास अशा संस्थाविरुद्ध कारवाई करणार, असे शासननिर्णयात म्हटले आहे.

प्रवेशाच्या वेळी अशा विद्यार्थ्यांकडून फक्त त्यांच्या हिश्श्याची 50 टक्के रक्कम शिक्षण संस्थानी घेणे अपेक्षित आहे. उर्वरित 50 टक्के रक्कम शासनाकडून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. तद्नंतर विद्यार्थ्यांनी ती शिक्षण संस्थांमध्ये भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना 50 टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती गरजेचे आहे. त्या पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना 50 टक्के शिक्षण शुल्क भरल्यास त्यांना प्रवेश देणे क्रमप्राप्त आहे.