14 हजार 639 करदात्यांनी जमा केला कर
पुणे : महापालिकेच्या तिजोरीत आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 12 कोटी 51 लाख रुपयांचा मिळकतकर जमा झाला आहे. सुमारे 14 हजार 639 करदात्यांनी हा कर जमा केला आहे. मिळकतकर विभागाने या आर्थिक वर्षासाठी तब्बल 7 लाख बीले पोस्टाच्या माध्यमातून गेल्या 27 मार्चपासून नागरिकांना पाठविली असून उर्वरीत साडेतीन लाख बीले पुढील 2 दिवसांत पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी बीलाची वाट न पाहता मिळकतकर क्रमांकाच्या आधारे ऑनलाइन पध्दतीने तातडीने कर भरणा करावा, असे आवाहन करसंकलन विभागाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांना 5 ते 10 टक्के सवलत
महापालिकेकडून 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीत कर भरणार्या नागरिकांना मिळकतकरात 5 ते 10 टक्के सवलत दिली जाणार आहे. महापालिकेच्या ऑनलाईन कर भरणार्या मिळकतधारकांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. पहिल्याच दिवशी कर जमा करणार्यांमध्ये सुमारे 12 हजार 639 जणांनी 10 कोटी 92 लाख रुपये ऑनलाइन स्वरुपात भरले आहेत. तर 647 मिळकतधारकांनी 75.54 लाखांची रक्कम धनादेशाद्वारे जमा केली असून 1,353 मिळकतधारकांनी सुमारे 83.53 लाख रुपयांचा भरणा रोखरकमेद्वारे केला असल्याचे महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून सांगण्यात आले.