आर्थिक वर्षात तब्बल 5252 फुकट्या प्रवाशांवर एनएमएमटी विभागाकडून कारवाई

0

नवी मुंबई । महापालिकेचा परिवहन उपक्रम तोट्यात आहे. दैनंदिन उत्पादनातील तूट भरून काढण्यासाठी उपक्रमाचे विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी एनएमएमटी व्यवस्थापनाला फुकट्या प्रवाशांची डोकेदुखी झाली आहे. फुकटात प्रवास करणाजयांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चालू आर्थिक वर्षात तब्बल 5252 फुकट्या प्रवाशांवर एनएमएमटीने कारवाई केली आहे. हे प्रमाण गत वर्षीच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून आले आहे. एनएमएमटीच्या ताफ्यात वातानुकूलित आणि सर्वसाधारण अशा एकूण 452 बसेस आहेत.त्यापैकी 415 बसेस सध्या रस्त्यावर धावतात. या बसेस एकूण 75 मार्गावर दररोज 12,6699.2 कि.मी. अंतर प्रवास करतात. यात 64 वातानुकूलित बसेसचा समावेश असून त्या 11 मार्गांवर धावतात. एनएमएमटीतून दिवसाला साधारण 2.6 लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, उरण आणि पनवेलपर्यंत एनएमएमटीच्या गाड्या धावतात. असे असले तरी विविध कारणांमुळे एनएमएमटीची सेवा तोट्यात चालली आहे. व्यवस्थापनाला उत्पन्नाचे निर्धारित ध्येय गाठताना कसरत करावी लागत आहे.

उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ घालताना उपक्रमाला कसरत करावी लागत आहे. त्यामुळे उपक्रमाचा गाडा हाकण्यासाठी महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहवे लागत आहे. यातच फुकट्या प्रवाशांनी व्यवस्थापनासमोर आव्हान निर्माण केले आहे. एनएमएमटीच्या बसेसमधून फुकटात प्रवास करणाजया प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2016-2017मध्ये उपक्रमाने एकूण 4095 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून 4 लाख 63 हजार 106 रुपयांचा दंड वसूल केला होता. तर चालू आर्थिक वर्षात म्हणजेच 2017-18 या कालावधीत तब्बल 5252 फुकट्या प्रवाशांवर उपक्रमाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 6 लाख 22 हजार 469 रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दंडाचे प्रमाण 34 टक्क्यांनी अधिक असल्याचे दिसून आले आहे.

एकूण 981 चालक कार्यरत
एनएमएमटीचा कारभार सुरक्षित व लोकाभिमूख करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापनाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. सध्या उपक्रमाच्या तुर्भे आसुडगाव आणि घणसोली आगारात एकूण 981 चालक कार्यरत आहेत. या चालकांना वर्षातून तीन वेळा प्रशिक्षण दिले जाते. यात अपघात टाळणे, इंधनाची बचत, सुरक्षित प्रवास व व्यसनमुक्ती आदींचा समावेश आहे. त्यामुळे अपघातांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. तसेच इंधन वापरात बचत झाल्याचे दिसून आले आहे. परिवहनच्या नादुरूस्त गाड्या हा नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. भररस्त्यात गाड्या बंद पडणे हे प्रकार नेहमीचेच झाले आहे. 2017-2018 या आर्थिक वर्षात विविध मार्गावर धावणाजया एनएमएमटीच्या बसेसना 146 अपघातांची नोंद झाली. यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 5 जण गंभीर जखमी आहेत. 22016-2017 मध्ये एनएमएमटीचे एकूण 199 अपघात नोंदविले गेले आहेत.