खडकी : कारागिरांची कमतरता, बँकाची असहकार्याची भूमिका व अधूनमधून होणारा पावसाच्या व्यत्यय यांमुळे गणेशमूर्तिकार व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच जीएसटीमुळे त्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.
अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी गणेशभक्त व मंडळे जय्यत तयारीस लागले आहेत. मात्र यंदा गणेशभक्तांना गणेशमूर्तीसाठी जादा किंमत मोजावी लागणार आहे. ग्राहकांना दरवाढीची झळ सोसावी लागणार आहे. तर दुसरीकडे कच्च्या मालात झालेल्या भाववाढीमुळे व्यावसायिकही अडचणीत सापडले आहेत. शाडू, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, प्लॅस्टिक पेंट, वॉटर पेंट व काथ्या यांच्या किमतीत झालेली 30 टक्के दरवाढ यांमुळे गणेशमुर्तिकार व्यावसायिकांना गणेशमूर्तीच्या किमतीत दहा ते वीस टक्के दरवाढ करावी लागणार आहे, कारागिरांनी या व्यवसायाकडे फिरवलेली पाठ, व्यवसायाकरिता आर्थिक पाठबळ देण्याकामी (कर्ज), बँकानी दाखवलेली असमर्थता व त्यातच नवीन कर प्रणाली जीएसटीमुळे गणेशमूर्ती साहित्यामध्ये झालेली दरवाढ यामुळे गणेशमूर्तिकार व्यावसायिकांवर अडचणीचे डोंगर कोसळले आहे. अशी व्यथा येथील मूर्तिकार व्यावसायिक निलेश दळवी यांनी बोलताना मांडली. दळवी हे मागील 27 वर्षांपासून या व्यवसायात असून त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे.
यंदाच्या गणेशोत्सवा करिता त्यांनी जानेवारी महिन्यापासूनच गणेशमूर्ती घडविण्याच्या कामास प्रारंभ केला आहे. काही कच्या मूर्ती पेण येथून मागविल्या असून उर्वरित छोट्यि-मोठ्या मूर्ती त्यांनी स्वतः हाच घडविल्या आहेत. कारागिरांचा मोठा जटील प्रश्न असताना नातेवाइकांच्या मदतीने तो प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. अहमदनगर येथल चार कारागीर मोठ्या मानधनावर अखेर मिळाले कारागिरांची कमतरता व त्यांचे न परवडणारे मानधन, मूर्ती घडविण्याकरिता लागणारे साहित्य, जागेचे भाडे, पावसाचा व्यत्यय व या व्यवसायाकरिता लागणारे भांडवली खर्चाबाबत बँकाची कर्ज देण्याकामी असलेली निरागसता आणि त्यातच जीएसटी या नवीन कर प्रणालीची भर यामुळे मूर्तिकार व्यावसायिक मोठ्या अडचणीत आला असल्याचे यावेळी दळवी यांनी सांगितले. बँकानी या व्यावसायिकांकरिता खुले धोरण स्वीकारून कर्ज देण्याबाबतची मानसिकता निर्माण करावी. ज्यामुळे मूर्ती व्यवसायिकांना मोठे पाठबळ मिळेल, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
यंदाच्या गणेशोत्सवा करिता दळवी यांनी एक हजार लहान मुर्त्या तर आठशे, मोठ्या मुर्त्या घडविल्या आहेत. 80 टक्के गणेशमूर्तींची विक्री आगाऊ बुकिंग मध्येच झाली असल्याचे दळवी यांनी सांगितले. लालबागचा राजा व दगडूशेठ हलवाई गणेशमूर्तींना गणेशभक्तांची सर्वाधिक मागणी असल्याचे ते म्हणाले. यंदाच्या गणेशोत्सवाकरिता ग्राहकांचा कल व आवड पाहता बाहुबली गणेशमूर्ती व तुळशीबाग गणेशमूर्ती यावर्षी खास घडविण्यात आल्या आहेत. या मूर्तींकडे ही गणेशभक्तांचा चांगला कल असल्याचे दळवी त्यांनी सांगितले. त्यांच्या कडील गणेशमूर्तीची मागणी केवळ पुणे, पिंपरी-चिंचवड शहारातूनच नव्हे तर सोलापूर, मुंबई, धुळे, नगर आदी शहरांसहित कोलकता व अमेरिकेतील गणेशभक्तांकडून ही केली जाते असे दळवी यांनी आवर्जून सांगितले.