आर्यन नेहराला तिसरे सुवर्णपदक

0

पुणे । महाराष्ट्राच्या आर्यन नेहराने सातत्यपूर्ण कामगिरी करताना गुरुवारी राष्ट्रीय अजिंक्यपद जलतरण स्पर्धेतील शर्यतींमध्ये वैयक्तिक तिसर्‍या सुवर्णपदकाची कमाई केली. आर्यनने मुलांच्या तिसर्‍या गटातील 800 मीटर फ्रिस्टाईल शर्यतीत गोव्याच्या इक्बाल झिदानेला मागे टाकत 9:00: 56 मिनीटे अशा कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले.

आर्यनने तब्बल 16 सेंकदांच्या फरकाने इक्बालला मागे टाकले होते. इक्बालने 9:16:55 मिनीटे अशी वेळ नोंदवत दुसरे स्थान मिळवले. तिसरा क्रमांक मिळवणार्‍या राज रेळेकरने 9:24:70 मिनीटे अशी वेळ नोंदवली. अन्य शर्यतींमध्ये महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी छाप पाडली. मुलींच्या पहिल्या गटातील चार बाय 100 मीटर फ्रिस्टाईल रिले स्पर्धेत साध्वी धुरी, त्रिशा कारखानीस आणि रायना सालढाणाने 4:15:70 मिनीटे अशा वेळेसह सुवर्णपदक जिंकले. या शर्यतीत कर्नाटकाला रौप्य आणि बंगाल संघाने कांस्यपदक मिळवले. मुलींच्या दुसर्‍या गटातील चार बाय 100 मीटर फ्रिस्टाईल प्रकारातील सुवर्णपदक महाराष्ट्रानेच जिंकले.