आर.आर.विद्यालय प्रशासकास संस्थाचालकाचा विरोध

0

जळगाव । ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब रुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व संस्थाचालक यांच्यातील वाद संपूर्ण राज्याला परिचीत आहे. संस्थाचालक अरविंद लाठी यांनी मुख्याध्यापक डी.एस.सरोदे यांचा राजीनामा घेतल्यानंतर आर.आर.विद्यालयात मुख्याध्यापकाचे पद रिक्त आहे. अखेर शासनाने विद्यालयावर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. प्रशासक म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी प्रशासक संस्थाचालकाकडून पदभार घेण्यासाठी विद्यालयात आले, मात्र संस्थाचालक प्रशासकास पदभार देण्यासाठी आले नाही. यावरुन प्रशासकास संस्थाचालकाचा विरोध असल्याचे दिसून येते. दुपारी उशीरापर्यत प्रशासक विद्यालयात थांबून होते मात्र संस्थाचालक न आल्याने त्यांना परत जावे लागले.

आदेश झुगारले
आर.आर.विद्यालयावर प्रशासकाची नेमणूक शिक्षण संचालक यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे. 15 नोव्हेंबर रोजी शिक्षण संचालकाचे पत्र माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना प्राप्त झाले. शैक्षणिक व्यवस्थापन अधिनियम 1976 मधील कलम 3 (1) अन्वये शिक्षण संचालकांनी प्रशासकाची नियुक्ती केली आहे. शिक्षण संचालकांनी संस्थाचालक अरविंद लाठी यांना देखील प्रशासकाला पदभार देण्यात यावे असे पत्र पाठविले आहे. मात्र शिक्षण संचालकाचे आदेश झुगारुन संस्थाचालक पदभार देण्यासाठी आले नाही. 25 नोव्हेंबरपर्यंत संस्थाचालकाला पदभार देण्याची संधी देण्यात आली आहे. 25 नंतर पदभार न दिल्यास जप्तीची कारवाई करण्यात येईल.

शिक्षण संचालक यांचे प्रशासक म्हणून नियुक्तीचे पत्र प्राप्त झाले. त्यानुसार पदभार घेण्यासाठी सकाळी कार्यालयीन वेळेत विद्यालयात पदभार घेण्यासाठी आलो, याबाबत संस्थाचालकांना देखील कळविण्यात आलेले होते. मात्र ते पदभार देण्यासाठी आले नाही. याबाबत शिक्षण संचालक यांना कळविणार आहे.
– देविदास महाजन
प्रशासक (माध्यमिक शिक्षणाधिकारी)