शिरपूर । धुळे जिल्ह्यातील नामांकीत महाविद्यालय असलेल्या आर.सी.पटेल संकुलात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी दोन दिवसीय तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजीत करण्यात आली. कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली. संस्थेच्या एस.एम.पटेल ऑडीटोरीअम हॉलमध्ये 17 व 18 जून रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शिक्षकांना डिजीटल व तंत्रज्ञानासंबंधी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रभाकरराव चव्हाण होते. शिक्षकांना तंत्रज्ञानाचा वापर करुन विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यत तंत्रज्ञान पोहोचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्यासाठी
आमदार अमरिशभाई पटेल यांच्या स्वप्नातील मुंबईशी स्पर्धा करणारे विद्यार्थी घडवायचे असल्याने संस्था नेहमी शिक्षकांच्या पाठीशी असते. विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून शिक्षकांच्या हातून अध्यापनाचे चांगले कार्य घडावे अशी अपेक्षा संस्थेचे सचिव प्रभाकरराव चव्हाण यांनी व्यक्त केले. तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या कामासाठी करण्यात यावा. तंत्रज्ञानातून आधुनिक विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांच्या हाती आहे. संस्थेतील शिक्षक मेहनती असल्यानेच आज संस्थेचा निकाल दरवर्षी वाढत जात असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वतंत्र ब्लॉग हवा
सोशल मिडीयाची ताकत दिवसेंदिवस वाढत आहे. ब्लाँग हा सोशल मिडीयाचा एक भाग असून प्रत्येक नागरिक याच्या माध्यमातून आपले विचार प्रकट करु शकतो. ब्लाँगच्या माध्यमातून अभिव्यक्त होता येते. तंत्रस्नेही प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन करतांना मनोहर वाघ यांनी शिक्षकांसह मुख्याध्यापकांना आपल्या शाळेचा व स्वत:चा ब्लॉग कसा तयार करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षण वर्गातील शिक्षकांना त्यांच्या स्मार्ट फोनवरच प्रत्यक्ष कृतीयुक्त प्रशिक्षण देण्यात आले.
350 शिक्षकांनी घेतला सहभाग
प्रशिक्षणास 350 प्राथमिक शिक्षक उपस्थित होते. प्राचार्य सिद्धार्थ पवार, व्ही.पी.दिक्षीत, सी.डी.पाटील, पी.डी.कुलकर्णी, महेंद्र परदेशी, आर.बी.खोंडे, क्रांती जाधव, रेखा सुर्यवंशी, आर.टी.भोई, मनोज पाटील, बी.आर.महाजन, ईश्वर पाटील, प्रदीप गहिवरे, गोपाल पाटील, ज्युली थॉमस आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. दिनेश धनगर यांनी स्मार्ट फोनचा वापराबाबत, अशोक ढिवरे यांनी ऑनलाईन चाचणी तर गोकुळ थोरात यांनी व्हिडीओ कसा तयार करावा याविषयी मार्गदर्शन केले.