लाल बत्ती हिरवी झाली,
आली कोकण गाडी
ठाणे मुंब्रा कल्याणाची,
ओलांडून खाडी
आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी….
कोकण रेल्वे येण्यापूर्वी कोकणात अत्यंत आवडीने हे गाणं म्हटलं जायचं. कोकण रेल्वे हे कोकणी माणसाचं स्वप्न होतं. ते स्वप्न साकार झालं, जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यावर. मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस केंद्रात मंत्री झाल्यानंतर कोकण रेल्वेला चालना मिळाली आणि त्याला श्रीधरनसारखा कर्तबगार अधिकारी मिळाल्यावर ते स्वप्न प्रत्यक्षात कोकणात अवतरलं. कोकणी लोकांचा दबाव, राजकीय आंदोलने, नंतर कोकण रेल्वेचे बॉण्ड खरेदीसाठी दिलेला प्रतिसाद, राजकीय नेत्यांचा सक्रिय पाठिंबा आणि श्रीधरनसारख्या अधिकार्यांनी कामात दाखवलेली धडाडी.
हे सगळं आठवण्याचे कारण म्हणजे मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या भूमिपूजनानंतर लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण झाले आहेत. काही शंका निर्माण झाल्या आहेत. त्याची उत्तरे राज्यकर्त्यांना कधी ना कधी द्यावीच लागतील. बुलेट ट्रेन होईल तेव्हा होईल, पण तत्पूर्वी देशातील कोट्यवधी प्रवाशांचा रेल्वे प्रवास कसा व कधी सुखकर होणार हा प्रश्नच आहे.कालच्या आणि ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत पडलेल्या पावसाने रेल्वेच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगलेली सार्यांनी पहिली.
मूठभर लोकांसाठी चालवलेला हा विकास कुणाच्या मुळावर येणार आहे? विकास कुणाचा? आणि कोणती किंमत देऊन? पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवशी सरदार सरोवराचे राष्ट्रार्पण झाले. पंडित नेहरू यांनी 1961 रोजी सरदार सरोवराच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. बरोबर 56 वर्षांनी हा प्रकल्प मोदींनी राष्ट्राला अर्पण केला आहे. या मधल्या काळात मेधा पाटकर यांनी पर्यायी विकास नीतीचे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे केले आहेत. मोठ्या धरणांची गरज जी दाखवली जाते ती तशी प्रत्यक्षात नाही हे मेधा पाटकर यांनी दाखवून दिले आहे. मोठी धरणे बांधण्यात पैसा, वेळ खर्च करण्याऐवजी छोटी धरणे, जलसंधारण याकडे लक्ष दिले पाहिजे. बुलेट ट्रेनसारखा प्रकल्प पुढे रेटण्याऐवजी छोटे रेल्वे प्रकल्प मार्गी कसे लावता येतील, त्याकडे लक्ष दिले पाहिजे.मुंबई ते अहमदाबाद हे 508 कि.मी.चे अंतर कापण्यासाठी तब्बल एक लाख दहा हजार कोटी रुपये खर्च या प्रकल्पाला येणार आहे. 108 कि.मी.चा रेल्वे मार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे, तर 400 कि.मी. मार्ग गुजरातमधून जाणार आहे. महाराष्ट्र सरकार या कामासाठी किती पैसे देणार आहे. कोकण रेल्वे दोन पदरी मार्ग, मराठवाड्यातील रेल्वे मार्ग, कराड-चिपळूण, धुळे-इंदूर आदी अनेक प्रकल्पांची लोक वाट बघताहेत. दररोज देशात अडीच कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात, तर एकट्या मुंबईत 75 लाख लोक प्रवास करतात. या सर्व गरीब, मध्यमवर्गीय लोकांचा प्रवास कधी सुखावह होणार? हा प्रश्न अच्छे दिन आणणार्या सरकारला विचारला पाहिजे. नर्मदा बचाव आंदोलनात मेधा पाटकर यांनी हाच प्रश्न विचारला, विकास कुणाचा आणि कोणती किंमत देऊन, अविकसित भागात ट्रेनचे जाळे उभारणे ही विकासाकडे वाटचाल ठरते. कोकण रेल्वेकडे त्या दृष्टीने बघितले गेले. मात्र, बुलेट ट्रेन चालवताना पुन्हा मेधा पाटकर यांनी विचारलेला हाच प्रश्न पुन्हा नव्याने या सरकारला विचारावासा वाटतो, प्रवास कुणाचा आणि कुणाचा बळी देऊन?
-शरद कदम
अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल,मुंबई
9224576702