नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
आळंदी : आळंदीमधील कोयाळीनंतर आता बिबट्याचे दर्शन आळंदी आणि चर्होली खुर्दच्या हद्दीत झाले. आळंदीतील विश्रांतवडाच्या परिसरात गुरुवारी पहाटे नागरिकांना बिबट्या दिसला होता. बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. खेडच्या पूर्व भागातील कोयाळी गावात दिघे भाडळे वस्तीवर मंगळवारी बिबट्याने शेळीचा फडशा पाडला. ऊसाच्या शेतात काम करणार्या आणखी दोघांवर डरकाळी फोडल्याने पूर्व पट्ट्यात बिबट्याच्या दहशतीने कोयाळीकर भयभीत झाले. त्यानंतर आता गुरुवारी (ता. 1) पहाटे साडेतीनच्या सुमारास वडगाव घेनंद येथील अॅड.शाम बवले आणि सत्यवान बवले त्यांच्या चारचाकीतून लोहगाव विमानतळाकडे जात होते. चर्होली खुर्द सोडून आळंदी हद्दीत प्रवेश करतेवेळी विश्रांतवडाच्या समोरच बिबट्या रस्ता ओलांडत होता.
ठाकवस्तीच्या बाजूने बिबट्या आला
येथील ठाकर वस्तीच्या बाजूने बिबट्या आला आणि रस्ता ओलांडून पुन्हा ऊसाच्या शेताच्या आसर्याला गेला. त्याठिकाणी बिबट्याने विश्रांतीही घेतली. याबाबत अॅड. शाम बवले यांनी सांगितले की, पहाटेच्या वेळी आमच्या गाडीसमोरच बिबट्या रस्ता ओलांडत असताना आम्ही पाहिला आणि सुरवातीला भयभित झालो. मात्र, गाडीच्या प्रखर प्रकाशझोत असल्याने त्याचा उपद्रव जाणवला नाही. आम्ही त्यानंतर त्याचा व्हिडीओही काढला. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. खेडच्या पूर्व पट्ट्यात कोयाळी, मरकळ, गोलेगाव, वडगाव घेनंद हा बागायती पट्टा आहे. हळूहळू बिबट्या नागरी क्षेत्राकडे वळू लागला. मात्र नागरी वस्तीवर बिबट्यामुळे चिंता अधिक वाढली आहे.