पिंपळवंडी । भाजी बाजारातील जागा अपुरी पडत असल्यामुळे विक्रेत्यांनी आळेफाटा येथील बसस्थानकालगत असलेल्या जागेत बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून मोठी जिवीत हानी होण्यापूर्वीच ही अतिक्रमणे हटवून भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
आळेफाटा येथील संत सावतामाळी मंदिराजवळ भाजीबाजार भरत असून या ठिकाणी असलेली जागा अपुरी असल्यामुळे काही व्यापारी व शेतकरी हे आळेफाटा येथील बसस्थानकालगत भाजीपाला विकण्यासाठी बसतात. साधारणत: एक महिन्यांपूर्वी हा भाजीबाजार आळेफाटा बसस्थानकातील असलेल्या पोलिस चौकीजवळ भरत होता. मात्र, या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर हा बाजार बसस्थानकाजवळच परंतु, पुणे-नाशिक महामार्गालगत भरविण्यास सुरुवात झाली.
अपघाताच्या घटना वाढल्या
आळेफाटा चौकात वाहतुकीची कायमच वर्दळ असल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याचा संभव असून ते एखाद्याच्या जिवावर बेतू शकते, या ठिकाणी असलेले व्यापारी व शेतकरी जीव धोक्यात घालून व्यवसाय करीत आहेत. यापूर्वी आळेफाटा बसस्थानकात एसटी बसचा धक्का लागून एका व्यक्तीला आपला पाय गमवावा लागला आहे तर एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. याबाबत राज्य परीवहन महामंडळाच्या आळेफाटा बसस्थानकाकडे व पोलिसांकडे वारंवार तक्रारी देण्यात आल्या आहेत, लेखी तक्रारी देऊनही या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे.
दंडात्मक कारवाई
आळेफाटा येथे महामार्गालगत फळविक्री करणार्या फळविक्रेत्यांना नोटिसा बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्याची माहीती आहे. त्यांच्यावर कारवाई करताना भाजीपाला विक्रेत्यांवर मात्र कारवाई केली जात नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धती विषयी नागरीकांमधून शंका उपस्थित केली जात आहे.