आवक वाढल्याचे गव्हाचे दर कोसळले

0

भुसावळ । गेल्या वर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे परिसरातील विहिरींच्या जलपातळीत समाधानकारक वाढत झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामात भुसावळ तालुक्यासह विभागात गहू पिकाची पेरणी वाढली होती. गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी गव्हाचे दर 2 हजार ते 2300 रुपये प्रतिक्विंटल होते. मात्र, नवीन गहू बाजारात येताच 1600 ते 1800 रुपये प्रतीक्विंटलवर गव्हाचे दर घसरले आहेत. नवीन गहू बाजारात येताच दर कोसळल्याने शेतकर्‍यांना फटका बसला आहे.

मोठ्या प्रमाणावर पेरणीचा परिणाम
भुसावळ विभागात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा गव्हाचे लागवड क्षेत्र वाढले. पावसाळ्यात सर्वच भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. यामुळे यंदा रब्बीत पेरणीचे क्षेत्र वाढले. भूजलपातळी वाढल्याने कमी पाणी असलेल्या विहिरींची पातळी वाढली. यामुळे शेतकर्‍यांनी गव्हाच्या पेरणीला प्राधान्य दिले. गेल्या आठवड्यापासून विभागातील गहू कापणीला सुरूवात झाली. होळीनंतर पुन्हा कापणी आणि मळणीला वेग येणार आहे. मात्र नवीन गहू बाजारात येताच दर कोसळले आहेत. गेल्या महिन्यात नवीन गहू येण्यापूर्वी प्रतिक्विंटल दर 2300 रुपये दरम्यान होते. मात्र हेच दर 1600 ते 1800 रुपयांच्या दरम्यान आले आहेत.