दोघांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव – तालुक्यातील आव्हाणा गावात मिठीखाडी भागात कोविड -19 (कोरोणा विषाणुच्या आजाराचा प्रभाव व प्रसार रोखण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे काम करणार्या कर्मचार्यांना शिवीगाळ केल्याची घटना बुधवारी १०.३०वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे
आव्हाणे येथील प्रगती विलास पाटील या आशा स्वयंसेविका कर्मचाऱ्यांसह गावात कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार बुधवारी सर्वेक्षणाचे काम करत होत्या. यादरम्यान इक्बाल अली सय्यद जी व शेख जाबीर शेख भिकन दोन्ही रा. आव्हाणे यांनी सर्वेक्षण करणाऱ्या प्रगती पाटील यांच्या हातातील शासकीय दस्तावेज असलेले रजिस्टर हिसकावून घेतले . तसेच दोघांनी प्रगती पाटील यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून दोघांची व्हिडीओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तालुका पोलिसात आशा स्वयंसेविका प्रगती पाटील यांच्या फिर्यादीवरून इक्बाल अली सय्यद जी व शेख जाबीर शेख भिकन या दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनिल मोरे करीत आहेत.