आशा कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्‍न व इतर मागण्या निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील

0

धुळे । आशा स्वयंसेविका कर्मचार्‍यांना त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रशासकीय व शासकीय पातळीवर संघर्ष करावा लागतो. आशा कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्‍न व इतर मागण्या निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्नशील असून त्यादृष्टीने येणार्‍या काळात प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी येथे केले. पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी दुपारी जिल्हास्तरीय आशा स्वयंसेविका पुरस्काराचे वितरण झाले. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

कर्मचार्‍यांचा मांडल्या समस्या
मंचावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, पंचायत समितीचे सभापती अनिता पाटील, उपसभापती दिनेश भदाणे, जिल्हा माता व बालसंगोपन डॉ. चारूलता पवार, गटविकास अधिकारी सी. के. माळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा आशा समन्वयक सरिता पाटील यांनी आशा कर्मचार्‍यांच्या समस्या येथे मांडल्या.

आशा कर्मचारी गावाच्या डॉक्टर
आशा कर्मचारी या गावाच्या डॉक्टरच असतात. मात्र, त्यांच्या मागण्या निकाली काढण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत आशा कर्मचार्‍यांच्या मागण्या सोडविण्यासाठी शासनाकडे नक्कीच प्रशासनामार्फत पत्र पाठवून पाठपुरावा केला जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. जिल्ह्यातील आशा कर्मचार्‍यांचे कामही उत्कृष्ट सुरू असल्याचेही त्यांनी येथे सांगितले.

…तर कारवाई करणार
जिल्हा परिषदेत आशा कर्मचार्‍यांना मिळणार्‍या मानधनाबाबत कार्यवाही होत नसल्याची अनेकदा ओरड होत असते. त्यासाठी आता आशा कर्मचार्‍यांचे मानधन काढण्यासाठी जिल्हा परिषदेत स्वतंत्र लिपीक नियुक्त केला आहे. तरीही आशा कर्मचार्‍यांचे मानधन निघत नसले, तर कर्मचार्‍यांनी तक्रार करावी, निश्‍चितच संबंधितावर कारवाई केली जाईल, असे आवाहन सीईओ गंगाथरन देवराजन यांनी येथे केले.