नवी दिल्ली । ऑलिम्पिक आणि विवाहानंतरची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणार्या साक्षी मलिकने आपल्यातली जिद्द पुन्हा एकदा दाखवून देताना धडाकेबाज खेळीचे प्रदर्शन करत आशियाई चॅम्पिनशिप स्पर्धेत पुनरागमन करून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. मलिक आणि विनेश फोगाट हिच्यासह तीन भारतीय महिला मल्लांनी येथे सुरू असलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. साक्षी आणि विनेशसोबत दिव्या काकरान ही देखील महिलांच्या 69 किलो गटात अंतिम फेरीत दाखल झाली आहे. या तिन्ही मल्लांनी भारताचे किमान रौप्य निश्चित केले. ऑलम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने जवळपास वर्षभराच्या आरामानंतर आशियाई चॅम्पिनशिप स्पर्धेत पुनरागमन करून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. साक्षी मलिकने 60 किलो वजनी गटात दमदार कामगिरी करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
रितू फोगाटला पराभवाचा धक्का
24 वर्षांच्या साक्षीने उपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानची नबीरा एसेनबायेव्हा हिला 6-2 ने नमविल्यानंतर उपांत्य फेरीच्या लढतीत अयायुलिम कासिमोवा हिला 15-3 ने पराभूत केले. निवेशची वाटचाल सोपी झाली. तिने महिलांच्या 55 किलो गटात उपांत्यपूर्व लढतीत उझबेकिस्तानची सेवारा इशमुरा हिच्यावर 10-0 ने आणि उपांत्य लढतीत चीनची झांग हिच्यावर 4-0 ने विजय नोंदविला. दिव्याचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास प्रभावी ठरला. तिने तायपेईची चेन ची हिला 2-0 ने आणि उपांत्य लढतीत कोरियाची हियोनयोंग हिला 12-4 ने धूळ चारली. महिला गटात 48 किलो गटात रितू फोगाट हिला मात्र सेमीफायनलमध्ये जपानची युई सुसाकी हिच्याकडून पराभवाचा धक्का बसला.
लौकिकाला साजेशी कामगिरी
विवाह बंधनात अडकल्यानंतर साक्षी मलिकने गेल्याच आठवड्यात कुस्तीच्या आखाड्यात वर्षभराच्या कालावधीनंतर पुनरागमन केले. साक्षीने राष्ट्रीय विजेती मंजू कुमारी हिच्यावर 10-0 अशी मात करून स्पर्धेची पात्रता फेरी पार केली होती. त्यानंतर साक्षीचे आशियाई स्पर्धेच्या 58 किलो वजनी गटासाठी निश्चित झाले होते. पण मुख्य स्पर्धेच्या वेळी साक्षी आता 60 किलो वजनी गटात मोडत असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या गटाकडून तिचा स्पर्धेत समावेश करण्यात आला. अखेर 60 किलो वजनी गटातही साक्षीने लौकिकाला साजेशी कामगिरी करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य व एक कांस्यपदक मिळवणारा सुशील कुमार, कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त, गीता व बबिता फोगट यांच्या अनुपस्थितीत भारताला साक्षी मलिककडून आशा आहेत. साक्षी अंतिम फेरीतही सर्वोत्तम कामगिरी करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावेल अशी आशा आहे.
अनिल, ज्योतीला कांस्यपदक
आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या अनिलकुमार आणि ज्योती यांनी दुसर्या दिवशी आपआपल्या गटात कांस्यपदके जिंकली. दुसरीकडे महिलांच्या 53 कि.गटात रितूचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. अनिलने ग्रीको रोमनच्या 85 किलो गटात उज्बेकिस्तानच्या मुहम्मदाली शमसिदिनोव्हविरुध्द शानदार पुनरागमन करताना 7-6 असा विजय मिळवून कांस्यपदक पटकावले. महिला गटात ज्योतीला 75 किलो वजन गटात सेमीफायनलमध्ये जपानच्या मसाको फुरुची हिच्याकडून हरल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दिवसभरात एकूण पाच सामने झाले, त्यापैकी भारताने दोन सामन्यात पदके मिळवली.