आशियाई टेबल टेनिसमध्ये शरथचे आव्हान संपुष्टात

0

नवी दिल्ली । आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे आव्हान जिवंत ठेवणाऱया शरथ कमलला शनिवारी उपउपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. हाँगकाँगच्या लॅम सियू हँगने 11-6, 9-11, 11-9, 12-14, 12-10 अशा फरकाने कमलवर विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये पराभव पत्करल्यानंतरही कमलने दमदार खेळ करताना पुनरागमन केले होते. मात्र लॅमने तिसरा गेम घेत 2-1 अशी आघाडी घेतली.

दोन्ही खेळाडू तुल्यबळ
चौथा गेम जिंकून आगेकूच करण्यासाठी उत्सूक असलेल्या लॅमला कमलच्या आक्रमक खेळाचा सामना करावा लागला. कमलने हा गेम घेत सामना 2-2 असा बरोबरीत आणला. निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूकडून तुल्यबळ खेळ झाला. 10-10 अशी बरोबरी असताना लॅमने दोन गुणाची कमाई करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. अन्य भारतीय खेळाडूमध्ये सौम्यजीत घोष, हरमीत देसाई व सनिल शेट्टी यांचे आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे. घोषला जपानच्या कोकी नवाने 3-11, 4-11, 5-11 असे पराभूत करत बाहेरचा रस्ता दाखवला. हरमीत देसाईला जपानच्या केईने 9-11, 11-8, 10-12, 4-11 असे पराभूत करत पुढील फेरी गाठली होती. सनिला शेट्टीचे आव्हान दक्षिण कोरियन के ली संगूशने 10-12, 8-11, 6-11 अशा फरकाने पराभूत करत संपुष्टात आणले.