आश्रमशाळांतील शिक्षकांची भरती कंत्राटी

0

पुणे : राज्य शासनाच्या आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान देण्यासाठी तज्ज्ञ व प्रशिक्षित संगणक शिक्षकांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे आता कंत्राटीपद्धतीने ही भरती करण्यात येणार असून शासनाकडून त्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

राज्याच्या विविध भागातील जिल्ह्यांमध्ये एकूण 502 आश्रमशाळा आहेत. यात इयत्ता पहिली ते सातवीच्या 84, पहिली ते दहावीच्या 297, पहिली ते बारावीच्या 121 आश्रमशाळांचा समावेश आहे. 21व्या शतकातील आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी संगणक ज्ञानाची नितान्त गरज निर्माण झालेली आहे. आश्रमशाळांमध्ये संगणक शिक्षकांचे पदच मंजूर नसल्याने विद्यार्थ्यांना संगणकाच्या ज्ञानापासून वंचित राहावे लागते.

आता, या सर्व शाळांमध्ये सुसज्ज संगणक कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक आश्रमशाळेत एक संगणक शिक्षक नेमण्यात येणार आहे. या निवड प्रक्रियेसाठी प्रत्येक जिल्ह्यात समिती स्थापन करण्यात येणार आहे. जाहिराती देऊन उमेदवारांचे अर्ज मागवून निवड होणार आहे. 11 महिन्यांसाठी शिक्षकाची निवड करण्यात येणार आहे. समाधानकारक काम असल्यास दोन वेळा मुदतवाढ देण्यात येणार आहे. दरमहा 20 हजार मानधन प्रत्येकाला अदा होईल.

पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण देणे बंधनकारक आहे. ई-लर्निंगपद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी विषय शिक्षकांना तांत्रिक मदत करणे. माहिती तयार करणे, आर्थिक देयके तयार करणे या तांत्रिक बाबतीत मदत करणे, यांचा समावेश आहे.