वासिंद । महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग आयोजित, अनुदानित आश्रमशाळांच्या ठाणे जिल्हा विभागीय वार्षिक क्रीडा स्पर्धा, शहापूर तालुक्यातील आत्मा मालिक शैक्षणिक संकुल मोहिली (तानसा) येथे झाल्या. 8 ते 10 डिसेंबर या तीन दिवस झालेल्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ गुरू माउली जंगलीदास महाराज, आदिवासी विकास ठाणे अप्पर आयुक्त चंद्रकांत डांगे, स्वामी परमानंद, सह.आयुक्त नगरे, उपायुक्त शेख, शहापूर प्रकल्प अधिकारी लोमेश सलामे, संस्थेचे कार्याध्यक्ष उमेश जाधव आदींच्या उपस्थितीत पार पडला. या स्पर्धांमध्ये डहाणू प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांनी खो खो, 400 मी. रिले, या सांघिक विजेतेपदासह उंच उडी, लांब उडी, भालाफेक, थाळीफेक या वैयक्तिक स्पर्धेत विजेतेपद पटकावून चॅम्पियन्स चषकाचा सन्मान पटकावला. शहापूर प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांनी हॉलिबॉल, सांस्कृतिक कार्यक्रम व धावणे यात अंतिम विजेतेपद पटकावले तर कबड्डी व हँडबॉलचे विजेतेपद जव्हार प्रकल्पाने मिळवले.
1700 विद्यार्थ्यांचा होता सहभाग
या स्पर्धांमध्ये पेण, सोलापूर, घोडेगाव या प्रकल्पांसह अनेक आश्रमशाळेतील 1700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी स्वामी परमानंद यांनी विद्यार्थ्यांना ध्यान साधनेचे महत्त्व प्रात्यक्षिकासह सांगितले, तर आयुक्त डांगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धांसाठी आत्मा मालिक संकुलाच्या संस्था संचालक व शिक्षकांनी मेहनत घेतली.