पिंपरी-आषाढीवारीतील दिंडीप्रमुखांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे यंदा भेटवस्तू म्हणून ‘तंबू’ देण्याचे विचाराधीन आहे. तसेच दिंडीप्रमुखांना याव्यतिरिक्त दुसरी कोणती भेट वस्तू हवी असल्यास ती सुचविण्याचे त्यांना सांगितले आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली. तसेच सर्व गटनेत्यांना सोबत घेऊन प्रशासनाने ‘तंबू’ खरेदी करावेत. त्याचा दर्जा तपासून घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत समारंभ व पालखी मुक्कामाच्या नियोजनाची आढावा बैठक आज (बुधवारी)पालिकेत पार पडली. या बैठकीला महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, प्रवीण अष्टीकर, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, राजेंद्र भामरे (वाहतूक) आदी उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शहरातून जातो. यापैकी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्काम असतो. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांसाठी हा एक आनंदाचा क्षण असतो. या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शहरवासियांकडून दिंडीतील वारकऱ्यांची अन्नदान, पाणी वाटप, नाष्टा दिला जातो. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढीवारीतील दिंडीप्रमुखांना दरवर्षी भेटवस्तू दिली जाते. गेली अनेक वर्षांपासून ही परंपरा पाळली जाते. याकरिता पंचवीस ते पन्नास लाख रुपये खर्च केले जातात. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून दिंड्यांना दिली जाणारी भेटवस्तू खरेदी वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.
महापौर नितीन काळजे म्हणाले, “आषाढवारीतील दोन्ही पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे यंदा भेटवस्तू म्हणून ‘तंबू’ देण्याचे विचाराधीन आहे. दिंडीप्रमुखांना याव्यतिरिक्त दुसरी कोणती भेट वस्तू हवी असल्यास ती सूचविण्याचे त्यांना सांगितले आहे. भेटवस्तूवरुन पुन्हा वाद उद्भभवू नये यासाठी सर्व गटनेत्यांना सोबत घेऊन प्रशासनाने ‘तंबू’ खरेदी करावेत. त्याचा दर्जा तपासून घेण्यात येणार आहे. तसेच पाणी, स्वच्छतागृह अशा विविध नागरी सुविधा मुबलक प्रमाणात पुरविण्याच्या सूचना संबंधि विभागाच्या अधिका-यांना दिल्या आहेत.