आसनगाव रेल्वेस्थानकात लवकरच नवीन होमफलाटासह सरकता जिना

0

शहापूर । मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकाला ग्रीन स्थानक म्हणून दर्जा मिळाल्यानंतर रेल्वे बोर्ड दिल्ली व रेल्वे मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी प्रवासी संघटनेसोबत पाहणी केल्यावर आसनगाव रेल्वेस्थानकात नवीन होमफलाटसह सरकता जिना, जुना पूल रुंद करणे तसेच प्रलंबित कामे लवकर करण्याबाबत सहमती दर्शवली. कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिलेल्या माहितीनुसार आसनगाव रेल्वेस्थानकात जुना प्लॅटफॉर्म होता तिथेच म्हणजे पश्‍चिमेला होम प्लॅटफॉर्म होणार आहे. काम सुरू व्हावे त्याचप्रमाणे सोबत जुना अरुंद ब्रीज यावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती होत असल्याने या ठिकाणी सरकता जिना व नव्याने पादचारी पुलही होणार आहे तसेच कल्याण ते कसारा डबल लाइन सेक्शन असल्याने या मार्गावर लोकल फेर्‍या वाढवताना व शटल सेवा चालवताना स्टेब्लिंग लाइन व होमफलाट हे आवश्यक होते. त्यानुसार संघटनेतर्फे आसनगाव होमफलाट व कसारा येथे स्टेब्लिंग लाइनचे काम पूर्ण होणे. त्याचप्रमाणे प्रवासीबांधवांच्या सुरक्षिततेकरिता जुने एफओबी दुरुस्तीसह या मार्गावर नव्याने एफओबी, एस्केलेटर सुरू व्हावे ही मागणी लावून धरण्यात आली होती.

होम फलाटांच्या नियोजित जागेचा केला सर्व्हे
या मार्गावरील वाढते अपघातांची संख्या पाहता संघटनेतर्फे वासिंद येथे सुसज्ज रूग्णालय सुरू करावे ही मागणीही केली आहे. टिटवाळा कसारा येथे ईएमआर सेवा सुरू होतायेत याबाबत समाधान व्यक्त करत कल्याण ते कसारा या सेक्शनवर तिसरी मार्गिकाच्या कामाला गती यावी व कल्याण ते आसनगाव चौथी मार्गिकाही सुरू करावी याबाबत सध्या संघटनेचा जोमाने पाठपुरावा सुरू असल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी सांगितले. या प्रलंबित मागण्यांच्या पार्श्‍वभूमीवर. रेल्वे बोर्ड दिल्ली व रेल्वे मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी आसनगाव येथे पाहणी केली. यावेळी आसनगाव होम फलाटांच्या नियोजित जागेचा सर्व्हे करण्यात आला. प्रत्यक्षात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन हे काम एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. त्यासोबत नविन एस्केलेटरचे कामही प्राधान्याने सुरू करण्यात येणार आहे. यावेळी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव, रेल्वे बोर्ड दिल्ली व रेल्वे मंत्रालयाचे आसिस्टंट डिव्हिजनल इंजिनीअर व्ही. व्ही.सतीशन, सीनिअर सेवशन इंजिनीअर अवदेश कुमार, मोहित कोहिली, बबन गायकवाड आदी उपस्थित होते.