आसूडयात्रेनंतर आता काय?

0

अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी 11 एप्रिलपासून शेतकर्‍यांसाठी काढलेली आसूडयात्रा चांगलीच गाजली. सीएम टू पीएम असा या आसूडयात्रेचा प्रवास होता. महाराष्ट्र ते गुजरात अर्थात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातून ही आसूडयात्रा सुरू झाली आणि तिची सांगता झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातेत… 11 ते 21 एप्रिल अशा तब्बल 10 दिवसांच्या यात्रेत आमदार बच्चू कडू यांनी उभा महाराष्ट्र पालथा घातला. राज्यातील कर्जबाजारी शेतकर्‍यांपासून विविध स्तरांतील लोकांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या आणि अतिशय फिल्मी स्टाइलने त्यांनी आपल्या या आसूडयात्रेची सांगता केली. यात्रा चांगलीच गाजली. मात्र, या आसूडयात्रेनंतर पुढे काय? हा प्रश्‍न आता उभा राहिला आहे.

ही आसूडयात्रा जेव्हा आमदार बच्चू कडू यांनी सुरू केली तेव्हा त्यांनी एक प्रश्‍न विचारला होता… चार लाख शेतकर्‍यांच्या आत्महत्या होऊनही महाराष्ट्र का पेटत नाही? दारूच्या व्यसनामुळे किंवा मुलीच्या लग्नाच्या काळजीमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत, असे सांगून शेतकर्‍यांची बदनामी केली जात आहे. शेतकर्‍यांना कोणी वाली नाही. जातीय दंगलीने गावे पेटतात. परंतु, चार लाख शेतकर्‍यांच्या आत्महत्या होऊनही महाराष्ट्र का पेटत नाही, अशी त्या संतप्त सवालाला पार्श्‍वभूमी आहे. आमदार बच्चू कडू यांची प्रहार शेतकरी संघटना शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक झाली आहे. या संघटनेत तरुणांचा भरणा मोठा आहे. अशा तरुणाईचे नेतृत्व बच्चू कडू करत आहे. यामुळेही त्यांच्या या आसूडयात्रेला अधिक महत्त्व आहे. याचे कारण म्हणजे सोलापूरच्या आसूडयात्रेतील सभेत बच्चू कडू म्हणाले होते की, केंद्र तसेच राज्यातील सरकारला धडा शिकवण्यासाठी धर्मेंद्र जन्माला येण्याची गरज आहे. आसूडयात्रेत तरुणांनी सहभाग घेतल्यास पंतप्रधान मोदी यांनाही घाम फुटेल. जात, पंथ, धर्म यामुळे शेतकर्‍यांची लढाई मागे पडली आहे. गेल्या 60 वर्षांत शेतकर्‍यांनी अनेकदा आंदोलन केले. या काळात केंद्र राज्यात अनेकदा सत्तापालट झाली, तरीही शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय झाले नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस आणखी किती आत्महत्यांची वाट पाहत आहेत. बच्चू कडू यांची ही सारी विधानं तरुण कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यास उपयुक्त अशीच आहेत. मात्र, केवळ विधानांनी आता काम भागणार नाही. या तरुणाईला ठोस कार्यक्रम देण्याची गरज आहे, हेही लक्षात घ्यावे लागले अन्यथा मूळ मुद्द्यापासून भरकटत जाऊन ही तरुणाईदेखील अन्य राजकीय पक्षांच्या तरुण कार्यकर्त्यांसारखी केवळ राजकीय खेळींची बळी ठरत जाईल. मुळात आमदार बच्चू कडू अपक्ष असूनही त्यांना तरुणांचा इतका पाठिंबा आहे, तो केवळ ते राजकारण करत नाहीत तर समाजकारणाकडेही त्यांचा ओढा अधिक असतो. या आसूडयात्रेतही बच्चू कडू यांच्यातील हा गुण पाहायला मिळाला.

यानिमित्ताने अजून एक मुद्दा पुढे आला. तो म्हणजे, आमदार बच्चू कडू बिनधास्त बोलतात. मग ते अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनींच्या बंपर पिण्याविषयीचे विधान असो किंवा भारतरत्न सचिन तेंडुलकरविषयी कबुतर असा उल्लेख करून ओढावून घेतलेला रोष असो. हा बिनधास्तपणा कार्यकर्त्यांमध्ये भिनला, तर ते संघटनात्मक कामांसाठी नक्कीच उचित ठरणार नाही. नेते बिनधास्त असणे वेगळे आणि कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या बिनधास्तपणाचा चुकीचा अर्थ लावून काम करणे आणखी वेगळे… ही अर्थ लावण्याची जी प्रक्रिया आहे ती कार्यकर्त्यांमध्ये घडवावी लागते. बच्चू कडू नक्कीच त्यांच्या कार्यकर्त्यांवर अन्वयार्थ लावण्याची ही प्रक्रिया घडवत असतील.

आता थोडं गंभीरपणे या आसूडयात्रेच्या फलिताकडे पाहूयात… नागपूरहून गुजरातकडे निघालेली ही आसूडयात्रा महाराष्ट्रातील अनेक गावांमधून पुढे गेली. या प्रवासात आसूडयात्रेतील नेत्यांनी स्थानिक शेतकर्‍यांच्या समस्या, त्यांचे प्रश्‍न समजू घेतले. हे प्रश्‍न समजून घेत असताना बच्चू कडूंचा शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावरील अभ्यास अधिक दांडगा झाला असणार, यात कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. यामुळेच की काय बच्चू कडू यांनी या संपूर्ण यात्रेत संघटनेची ठोस भूमिका स्पष्ट केलेली पाहायला मिळाली. ही भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितलंय की, महाराष्ट्र सरकारने आम्हाला फुकटात काहीच देऊ नये. आम्ही भिकारी नाही. आजपर्यंत प्रत्येक शेतकरी हा त्याच्या मेहनतीच्या बळावर जगला. पण शहरातील लोक, ज्यांचं शेतीशी कुठलेही सोयरसुतक नाही ते नेहमीच म्हणतात शेतकर्‍यांना सरकार खूप दान (भीक) देते. आम्ही मेहनतीने कमावलं त्यातूनच जगण्यासाठी खाल्लं आणि पुढेदेखील जगू. इतकंच नाहीतर जगाला जगण्यासाठी अन्न देत राहू. जगाला जगण्यासाठी अन्न देत राहू, ही जी बच्चू कडूंची भूमिका आहे, ती भूमिका खरेतर सरकारने नीट अभ्यासली पाहिजे, जेणेकरून त्यांना शेतकर्‍यांचा कर्जमाफीचा प्रश्‍न अधिक जलदगतीने सोडवण्यास मदत होईल. बच्च कडू यांच्या या आसूडयात्रेनिमित्ताने सरकारने शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे नव्याने पाहण्याची तयारी दर्शवली, तर ते या यात्रेचे सर्वात मोठे फलित ठरेल. यासाठी बच्चू कडूंनीदेखील सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजेे.

ही आसूडयात्रा जेव्हा अंतिम टप्प्यात पोचली तेव्हा पुन्हा एकदा बच्चू कडू यांच्या फिल्मी स्टाईलचा प्रत्यय आला. सीएम टू पीएम असा या यात्रेचा दौरा आखताना बच्चू कडू यांना एक गोष्ट ठामपणे माहिती होती ती म्हणजे, ही यात्रा राज्यस्तरावरून राष्ट्रीयस्तरापर्यंत नेणे. हा स्तर गाठण्यात ते काही अंशी सफलदेखील झाले. शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसह शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट लाभाने भाव व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या प्रमुख मागण्या घेऊन ही आसूडयात्रा काढण्यात आली होती. मात्र महाराष्ट्रातून निघून जेव्हा ही यात्रा गुजरातकडे रवाना झाली तेव्हा गुजरात पोलिसांनी नंदुबार जिल्ह्यातील नवापूर चेक पोस्टवरच या यात्रेला रोखले होते. गुजरात पोलिसांनी या आसूडयात्रेला गुजरातमध्ये परवानगी नसल्याचे कारण सांगून गुजरात सीमेवरच ही यात्रा रोखली होती. गुजरातमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर गावी जावून बच्चू कडू यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना रक्तदान करून गांधिगिरी मार्गाने या यात्रेची सांगता करायची होती. मात्र शेकडोच्या संख्येने तैनात असलेल्या गुजरात पोलिसांनी अखेर बळाचा वापर करत आंदोलनकर्त्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी व अपंग महिला, पुरुषांनाही फरफटत नेत पोलिसांच्या गाडीत डांबले. मात्र यानंतरही गनिमीकाव्याने बच्चू कडू गुजरातमध्ये पोचलेच. यात्रेची सांगता ठरल्या योजनेप्रमाणे झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपण जपला, अशी भावना बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केली. पण फिल्मी स्टाईलमुळे आसूडयात्रेचा मुख्य उद्देश सफल झाला का? किंवा येणार्‍या काळात तो सफल होईल का? याचा विचार आता बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे. अन्यथा अन्य आंदोलनांना मिळते तशी तत्कालिन प्रसिध्दी याही यात्रेला मिळेल आणि त्यामुळे मूळ मुद्दा भरकटून जावून तो अखेरीस संपले. असे होवू नये, म्हणूनच आमदार बच्चू कडू यांच्यासारख्या निडर नेत्याने संयमाने प्रश्‍नांना भिडले पाहिजे.

– राकेश शिर्के
9867456984